प्रदीप भणगे, डोंबिवली, 12 फेब्रुवारी : पाळीव कुत्र्याचा ओरडण्याचा त्रास झाल्यानं शेजाऱ्यांनी महिलेला मारहाण केली. त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. मात्र सदर महिलेचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरील एका चाळीत राहणाऱ्या नागम्मा शेट्टी या महिलेकडे एक पाळीव कुत्रा होता. मात्र हा कुत्रा सतत ओरडत असल्यानं आम्हाला त्रास होत असल्याची शेजाऱ्यांची तक्रार होती. यावरून सोमवारी रात्री नागम्मा आणि तिच्या शेजाऱ्यांमध्ये वाद झाले. यानंतर शेजारच्या चार महिलांनी मिळून नागम्माला मारहाण केली.
दरम्यान, या घटनेनंतर मानपाडा पोलिसांनी साधी एनसीदेखील नोंदवून घेतली नाही, असे भाजपच्या महिला ग्रामीण शहराध्यक्ष मनीषा राणे यांनी सांगितले. त्यामुळे या महिलेच्या पोरक्या झालेल्या चार मुलींनी मनीषा राणे यांच्याकडे धाव घेत व्यथा मांडली. याबाबत मनीषा राणे यांनी सुद्धा पोलिसांना जाब विचारला.
सोन्याच्या अंगठ्या चोरताना अभिनेत्रीला अटक, पुण्यातल्या मॉलमधली घटना
याप्रकरणी पोलिसांना जाब विचारताच पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेला तब्बल 24 तासांनी सुरुवात केली. मात्र अद्याप याप्रकरणी कुणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत मात्र पोलिसांनी प्रतिक्रिया बोलण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करायला का वेळ लावला असा प्रश उपस्थित होत आहे.