मुंबई, 03 एप्रिल : मुंबईत अशा अनेक जागा आहेत ज्या ठिकाणी जमिनी किंवा घरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रचंड मोठी रक्कम मोजावी लागते. अशाच मुंबईतील महागड्या परिसरांपैकी एक म्हणजे मलबार हिल. याच मलबार हिल परिसरात मुंबईतील आजवरच्या सर्वात महागड्या डीलपैकी एक डील झाली आहे. डी मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानी आणि त्यांचे भाऊ गोपालकृष्ण दमानी यांनी तब्बल 1001 कोटींचा खर्च करून याठिकाणी स्वतंत्र बंगला खरेदी केला आहे.
5752 चौरस मीटरच्या या घराचा व्यवहार 1 लाख 60 हजार रुपये प्रति चौरस फूट या दराने झाला. या घराचा बिल्ट अप एरिया हा जवळपास 60 हजार स्क्वेअर फूट एवढा आहे. ही मालमत्ता दमानी बंधू यांनी पूरचंद रॉयचंद अॅण्ड सन्स तसेच परेशचंड रॉयचंद अॅण्ड सन्स यांच्याकडून खरेदी केली.
वाचा - मिनी Lockdown! जेजुरीत खंडोबाच्या गडाचे दरवाजे 7 दिवस बंद
या बंगल्याचा व्यवहार 31 मार्च रोजी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. रियल इस्टेट क्षेत्राला उभारी देण्यासाठी सरकारनं स्टँप ड्यूटी कमी केली होती. 31 मार्च रोजी 3 टक्के स्टँप ड्यूटीचा लागणार होती, तर 1 एप्रिलपासून ती 5 टक्के होणार होती. त्यासाठी 31 मार्चला हा व्यवहार झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं दमानी बंधुंना या व्यवहारासाठी 30 कोटी रुपये स्टँम्प ड्यूटी भरावी लागली.
वाचा - भरधाव ट्रेनसमोर डान्स करत होता, पुढे असं काही घडलं की...; VIDEO पाहून थक्क व्हाल
राधाकृष्ण दमानी हे डी मार्टचे मालक आहेत. 2021 च्या एका रिपोर्टनुसार ते भारतातील आठवे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अगदी साधे राहणीमान आणि प्रसिद्धीपासून दूर राहणारे अशी दमानी यांची ओळख आहे.
यापूर्वीची मुंबईत झालेली अशा प्रकारची मोठी डील ही सायरस पुनावाला यांनी 2015 मध्ये प्रसिद्ध लिंकन हाऊस खरेदी केले तेव्हा झाली होती. त्यावेळी त्यांनी प्रसिद्ध ब्रीच कँडी परिसरातील ती मालमत्ता 750 कोटींमध्ये खरेदी केली होती. शाही कुटुंबाने वापरलेली ती मालमत्ता असल्याने या डीलचीदेखिल बरीच चर्चा झाली होती.