Home /News /mumbai /

BMC : मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना नगरसेवक आमनेसामने, प्रचंड बाचाबाची आणि घोषणाबाजी

BMC : मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना नगरसेवक आमनेसामने, प्रचंड बाचाबाची आणि घोषणाबाजी

मुंबईत शिवेसना आणि भाजप यांच्यातील याआधीचा रस्त्यावरील टोकाचा संघर्ष काही दिवसांपूर्वी बघायला मिळाला होता. त्यानंतर आज पुन्हा मुंबई महापालिकेत हा संघर्ष बघायला मिळाला.

  विशाल पाटील, प्रतिनिधी मुंबई, 21 जानेवारी : मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Election 2022) जसजशी जवळ येत आहेत तसतसा शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यातील संघर्ष (Clash) टोकाचा होताना दिसतोय. मुंबईत शिवेसना आणि भाजप यांच्यातील याआधीचा रस्त्यावरील टोकाचा संघर्ष काही दिवसांपूर्वी बघायला मिळाला होता. त्यानंतर आज पुन्हा मुंबई महापालिकेत (BMC office) हा संघर्ष बघायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती कार्यालयात बोलू दिलं नाही म्हणून भाजपच्या सर्व नगरसेवकांनी आज स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनासमोर धरणे आंदोलन केलं. यावेळी दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांकडून निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही बाजूचे नगरसेवक चांगले आक्रमक झालेले बघायला मिळाले. या गदारोळादरम्यान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आणि भाजप गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांच्यात शाब्दिक चकमक झाली. '20 वर्ष सोबत होता, तेव्हा तुमची तोंडं शिवले होते का?' "माझ्यावर चुकीचे आणि दिशाभूल करणारे आरोप करण्यात आले आहेत. गेल्या 15 बैठकांमध्ये सर्वात जास्त भाजप नगरसेवक बोलले. भाजपचा आरोप खोटारडा आहे. आम्हाला बोलू देत नाहीत, असं ते बोलत आहेत. पण याबाबत माध्यमांना सुद्धा माहीत आहे. ज्यावेळी चर्चा मागितली त्यावेळेस बोलू दिले. प्रत्येक वेळेला धांगडधिंगा, गोंधळ आणि आरडाओरड करतात, हे चुकीचे आहे. 20 वर्ष सोबत होता. तेव्हा तुमची तोंडं शिवले होते का? तुमचा बोलवता धनी कोण? केस वाढलेले, दाढी वाढलेला, टकला हे आहेत का? कोविड फंडाच हिशोब मागता, पीएम फंडाचा हिशोब मागायची धमक आहे का? 25 वर्ष सोबत होता. तुम्ही 3 लाख कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप करतात, तुम्हीपण होतात की सोबत?", असे सवाल स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव म्हणालेय. (सचिनचा जबरा फॅन, ज्या Police Station चं उद्घाटन केलं तिकडेच पोलिसांनी फटकावलं!) स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक यशवंत जाधव : वाझेचे बगलबच्चे आहात , शिवसेना समोर येऊन लढते पाठीत खंजीर खुपसत नाही प्रभाकर शिंदे : वाघाचे कातडे पांघरून कोल्हा दिसायचा राहत नाही उगाच वाघाचे कातडे पांघरू नका यशवंत जाधव : धतिंगगिरीला उत्तर धतिंगगिरीने देऊ. 20 वर्ष मांडीला मांडी लावून होतात आणि आता भ्रष्टाचाराचे आरोप करताय. आमच्या वाटेला जाऊ नका तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. हम भी कुछ कम नही भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांची प्रतिक्रिया "कायदा, समाजसशास्त्र सांगतो, जे विषय स्टॅंडिंगमध्ये येतात त्या प्रत्येक विषयावर बोलण्याचा प्रत्येक सदस्याचा हक्क आहे. आज रस्त्यांवरील पदपथाच्या सुशोभिकरणाचा विषय होता. संबंधित प्रस्ताव हा पूर्णपणे दिशाभूल करण्याचा प्रस्ताव होता. खरंतर मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने पालकमंत्र्यांचीसुद्धा दिशाभूल केली. या विषयावर आम्हाला बोलायचं होतं. पण या विषयावर कोणालाही न बोलू देता त्यांनी प्रस्ताव संमत केला. गेल्या बैठकांमध्येही असे तीन-चार विषय होते. पहिला विषय हा शैक्षणिक विद्यार्थ्यांना टॅब द्यायचा. जे टॅब 2015 साली 6 हजार 589 रुपयात घेतले आहेत. त्या टॅबची आजची किंमत ही 20 हजार रुपये आहे. पोईसर नदीचा प्रस्ताव होता जो प्रस्ताव 540 कोटीवरुन 1100 कोटींवर गेलाय. उद्यान आणि रस्त्यांचा विषय होता. पण या कोणत्याही विषयांवर भाजपला बोलू दिलं जात नाही. म्हणून भाजपचं आजचं हे धरणं आंदोलन आहे. गेल्या बैठकीनंतर आम्ही अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे. पण महापालिकेतील सत्ताधारी पक्ष कोणत्याही विषयावर चर्चा करु देत नाही. तसेच अविश्वासाचा ठराव दाखल करु देत नाही", अशा शब्दांत भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Chetan Patil
  First published:

  Tags: BJP, BMC, Mumbai News, Shivsena

  पुढील बातम्या