स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट, खोत भाजपच्या वाटेवर?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट, खोत भाजपच्या वाटेवर?

  • Share this:

22 मे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतला खोत - शेट्टी वाद आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलाय. कारण शेट्टी एकिकडे आत्मक्लेश यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेत पण त्यात सदाभाऊ खोत सहभागी होणार नसल्याचं जवळपास निश्चित आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे आतापासूनच भाजपसाठी उघडपणे मतं मागू लागलेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना उभ्या फूटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलीय.

शरद जोशींच्या शेतकरी संघटनेत फूट पाडत राजू शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटना काढली पण आता त्यातही फूट पडल्याचं चित्रं आहे. गेल्या आठवड्यात राजू शेट्टी हे नाशिकच्या शिवसेनेच्या मेळाव्यात हजर होते आणि त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. तर सदाभाऊ खोत हे काल पनवेलच्या भाजपच्या प्रचारसभेत हजर होते आणि भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्याचं त्यांनी आवाहन केलं. विशेष म्हणजे, पनवेलच्या पालिका निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना ही सेनेसोबत आहे. त्यांच्यासाठी प्रचार न करता सदाभाऊंनी भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन केलंय.

त्यामुळे दोन नेत्यांमधला हा वाद आता थेट रस्त्यावरही येऊन ठेपला आहे. राजू शेट्टींनी सरकारच्याविरोधात आत्मक्लेश यात्रा काढलीय तर त्याचवेळी सदाभाऊ इकडे विधीमंडळात सरकारची बाजू मांडत आहेत. दोन्ही नेत्यांमधल्या या वादाबाबत शेतकरी संघटनेच्या सामान्य कार्यकर्त्यांना मात्र, फारसं घेणंदेणं नाही आहे. जो शेतकऱ्यांची बाजू घेईल त्याला आम्ही खांद्यावर घेऊ अशी परखड प्रतिक्रिया आंदोलक कार्यकर्त्यांनी दिली आहे.

दोन शेतकरी नेत्यांमधला हा वाद असाच चिघळला तर संघटनेत उभी फूट पाडणार यात तीळमात्र शंका नाही. तसंही सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या 29 तारखेला सदाभाऊ खोत भाजपमध्ये जाहीरपणे प्रवेश करणार असल्याचा बातम्या कानावर येत आहेतच. पण खरंच असं झालं तर भाजपने अखेर शेतकरी संघटनेत उभी फूट पाडलीच म्हणायची, या आरोपाला एकप्रकारे पुष्टीच मिळणार आहे.

दरम्यान, आत्मक्लेश यात्रेत सदाभाऊ खोत यांच्या सहभागाबद्दल राजू शेट्टींना विचारलं असता त्यांनी हा विषय आता माझ्यासाठी चाऊन चोथा झालाय, अशी खोचक प्रतिक्रिया दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2017 11:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...