नवी दिल्ली 19 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. रात्री 12 वाजता शिंदे दिल्ली विमानतळावर दाखल झाले. दिल्लीत जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडकोर खासदारांनी राजधानीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्रीचं जेवण सोबत केलं. दिल्लीत दाखल होताच एकनाथ शिंदे आधीच दिल्लीतील (Eknath Shinde in Delhi) एका हॉटेलमध्ये थांबलेल्या खासदारांना भेटण्यासाठी गेले. आमदारांपाठोपाठ आता खासदारांनीही एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची वाट धरल्याने हा उद्धव ठाकरेंसाठी निश्चितच मोठा धक्का आहे (12 Shivsena MP in Delhi).
रात्रीच्या जेवणासाठी मुख्यमंत्र्यांसोबत कृपाल तूमाने, हेमंत गोडसे, धैर्यशील माने,राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे सदाशिव लोखंडे,भावना गवळी, संजय मंडलिक,श्रीकांत शिंदे यांच्यासह बारा खासदार उपस्थित होते. 12 खासदार उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, सध्या दिल्लीत थांबलेल्या खासदरांना घेऊन एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे.
यासोबतच बंडखोर खासदार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. यावेळी राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील 12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी करण्यात येणार आहे. लोकसभेच्या शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोद पदी भावना गवळी यांची नियुक्ती केल्याचे पत्र ते देणार आहेत. सोबतच आज दुपारी महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री आणि सर्व खासदार पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान नवा गट स्थापन करत शिंदेंसोबत जाणाऱ्या खासदारांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालय बाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आमदारांपाठोपाठ आता खासदारांनाही पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिला गेला आहे. बंडखोर खासदारांचे कार्यालय निवासस्थाने यांच्याबाहेर पोलीस बंदोबस्ताने छावणीचे स्वरूप आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Shivsena