Home /News /mumbai /

BREAKING : राज्याला मिळाले नवे गृहमंत्री, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पदभार!

BREAKING : राज्याला मिळाले नवे गृहमंत्री, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पदभार!

अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे

    मुंबई,5 एप्रिल : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh resign ) यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर नव्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्याकडे राज्याच्या गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी त्याबद्दलचे पत्र राज्यपालांना पाठवले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपद स्वीकारावे, असा सूर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लगावला होता. अखेर  त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दिलीप वळसे पाटील यांनी याआधीही गृहमंत्रिपद सांभाळले होते. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात अनुभवी अशा नेत्याकडे गृहमंत्रिपद द्यावे, असा विचार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता.  न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना दिलीप वळसे पाटील यांनी  या वृत्ताला दुजोरा सुद्धा दिला होता, अखेर त्यांच्याकडे गृहमंत्रिपद देण्यात आले आहे. वळसे पाटील का? दिलीप वळसे पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शिवाय आतापर्यंत तरी वादापासून दूर राहणे त्यांना जमलेलं आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार यांनी केला. अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केल्यामुळे अखेर हायकोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पण, अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असला तरी न्यायालयीन लढाईसाठी आता मैदानात उतरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख हे संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार आहे. आज रात्री उशिरा अनिल देशमुख हे दिल्लीत पोहचणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहे. हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनिल देशमुख यांनी ज्येष्ठ वकिलांचा सल्लाही घेण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या