मुंबई, 17 जुलै : पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीच्या मृत्यू नंतर वादात अडकलेले शिवसेनेचे नेते संजय राठोड (Shiv Sena Leader) यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळात पुनरागमनाचे संकेत दिले. तर काल बातम्या समोर आल्या की पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या बातम्यांमुळे संजय राठोड यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होणार हे जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जाऊ लागलं. मात्र, राठोडांच्या कमबॅकला ब्रेक लागला आहे.
पूजा चव्हाण या तरुणीच्या आई-वडिलांनी पुण्यातील वानवडी पोलिसांत (Vanvadi Police Pune) जबाब दिला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आमची कोणाच्याही विरोधात तक्रार नाहीये आणि आमच्यावर कुणाचाही दबाव नाहीये. पूजाच्या आई-वडिलांनी दिलेल्या या जबाबानंतर पुणे पोलिसांनी माजी मंत्री संजय राठोड यांना क्लीन चिट दिली असल्यांचं वृत्त समोर आलं. यामुळे संजय राठोड यांना दिलासा मिळाला असून लवकरच मंत्रिमंडळात संधी दिली जाईल अशी चर्चा रंगली. पण शुक्रवारी दुपारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी पुण्यात प्रतिक्रिया देत राठोडांच्या मंत्रिमंडळातील कमबॅकच्या चर्चांना ब्रेक लावला.
"...म्हणून शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट" राष्ट्रवादीने केला खुलासा
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं, "संजय राठोड यांच्या प्रकरणात पोलिसांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाहीये त्यामुळे क्लीन चिट देण्याचा प्रश्नच नाही, पुणे पोलीस तपास करत आहेत."
दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता संजय राठोड यांना क्लीन चिट मिळाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे आणि त्यामुळेच त्यांच्या मंत्रिमंडळात घेण्याच्या चर्चांनाही एकप्रकारे पूर्णविराम लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjay rathod