Home /News /mumbai /

मनसेचा झेंडा बदलताच मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटलांच्या मुलाचा पक्षाला 'रामराम'

मनसेचा झेंडा बदलताच मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटलांच्या मुलाचा पक्षाला 'रामराम'

मनसेचा झेंडा बदलताच मंत्रालयात आत्महत्या केलेले धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेची साथ सोडली आहे.

    मुंबई,23 जानेवारी: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये गुरुवारी पहिलं राज्यव्यापी महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनामध्ये मनसेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं आहे. भगवा झेंडा आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची 'राजमुद्रा' असं याचं स्वरूप आहे. मात्र, मनसेचा झेंडा बदलताच मंत्रालयात आत्महत्या केलेले धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेची साथ सोडली आहे. नरेंद्र पाटील यांनी मनसेला रामराम म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मनसेचे महाअधिवेशन सुरु असतानाच नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणे हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मनसेच्या तिकीटावर लढवली होती विधानसभा... नरेंद्र पाटील यांनी गेल्या सप्टेंबर महिन्यातच राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच प्रवेश केला होता. एवढेच नाही तर नरेंद्र पाटील यांनी मनसेच्या तिकीटावर धुळ्यातून विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच नरेंद्र पाटील यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या प्रदेश कार्यालयात अल्पसंख्याक सेलची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार माजिद मेमन यासारखे नेते उपस्थित होते. राज ठाकरेंकडून 'राजमुद्रे'चा गैरवापर, मनसेविरुद्ध पुण्यात तक्रार दाखल संभाजी ब्रिगेडने मनसेच्या नव्या झेंड्याला कडाडून विरोध केला आहे. राज ठाकरेंकडून शिवराजमुद्रेचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये मनसे आणि राज ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.'राजमुद्रे'चा गैरवापर करून मताचा जोगवा आम्ही मागू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे. मनसेने पक्षांच्या झेंड्यावरील राजमुद्रा तात्काळ हटवली नाहीतर थेट रस्त्यावर उतरून संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं उत्तर दिलं जाईल, अशा इशारा देखील संतोष शिंदे यांनी दिला आहे. मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा वापरण्यास सर्वात आधी आक्षेपही संभाजी ब्रिगेडनेच घेतला होता. त्यामुळे आगामी काळात राज्यात मनसेविरूद्ध संभाजी ब्रिगेड असा संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Maharashtra politics

    पुढील बातम्या