मुंबई, 27 सप्टेंबर : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्थापन केलेले महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपकडून वारंवार प्रयत्न झाले. पण आता खुद्द विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. 'हे सरकार आपल्या कृत्यामुळे पडेल, त्यानंतर बघू' असं विधान फडणवीसांनी केले आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते. अखेर खुद्द फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
'संजय राऊत यांच्या भेटीमुळे शिवसेनेसोबत अशी कोणतीही चर्चा सुरू नाही. त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यासाठी असे कोणतेही कारण नाही' असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया @Dev_Fadnavis pic.twitter.com/LAcBZ5UPWh
— News18Lokmat (@News18lokmat) September 27, 2020
तसंच, 'महाविकास आघाडी सरकारचे जे काम सुरू आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल, ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी आम्ही बघू. पण सरकार बनवण्याची सध्या कोणतीही घाई भाजपला नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
'संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेणार हे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांचा फोन आला होता. त्यामुळे मी काही अटी टाकल्या होत्या. त्यामुळे चर्चा करण्यासाठी राऊत यांची भेट झाली. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असंही फडणवीसांनी सांगितले.
एकमेकांच्या पायात पाय घालून सरकार पडले तर दोष देऊ नका - दानवे
तर दुसरीकडे न्यूज 18लोकमतशी बोलत असताना भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याबद्दल कोणतीही हालचाल सुरू नसल्याचा दावा केला आहे.
लक्षात ठेवा सरकार हे.., फडणवीस-राऊतांच्या भेटीवर NCP नेत्याने दिला इशारा
'महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कोणताही खटाटोप आमचा सुरू नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. अशा राजकीय भेटीगाठी होत असतात. आमचे काही राजकीय मतभेद असतील, तरी आमच्यामध्ये काही राजकीय वैमनस्य नाही', असं सूचक विधानही दानवेंनी केले.
तसंच, 'महाविकास आघाडी सरकार पडावे, असा कोणताही प्रयत्न भाजप करत नाही. पण, जर एकमेकांच्या पायात पाय पाडून जर सरकार पडत असेल तर त्याला भाजपला दोष देऊ नका, असा टोलाही दानवेंनी लगावला.