मुंबई, 23 मार्च: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी लेटर बॉम्ब टाकल्यामुळे राजाचे राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एक मोठा प्रहार केला आहे.
मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलातील बदल्यांमध्ये झालेल्या हेरफाराबद्दल महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहे.
'पोलीस दलांमध्ये बदल्याचे एक रॅकेट पकडले आहे. याबद्दलचा एक रिपोर्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आला आहे. मी मुख्यमंत्री असताना मुंबईमध्ये काही लोकं डील करत आहे आणि काही पोलीस अधिकारी तिथे जात आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर मी लगेच पोलीस आयुक्तांना बोलावलं आणि कारवाई केली होती. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली होती, कोर्टात आरोपपत्र सुद्धा दाखल करण्यात आले, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
'रश्मी शुक्ला या आर.आर.पाटील गृहमंत्री असताना संबंधीत पोलीस विभागात होत्या. शुक्ला यांना बदल्यांमध्ये काही व्यवहार सुरू असल्याचं कळालं होतं, त्यांनी ते पोलीस महासंचालकांना सांगितलं. त्यानंतर महासंचालकांनी कारवाई केली ती त्यांच्यावरच केली. 25 ऑगस्ट 2020 ला सीओआयने एक अहवाल महासंचालकांना दिला होता. त्यांनी ते पत्र हे मंत्रालयामध्ये पाठवले होते. सिताराम कुंटे यांनी या अहवालावर या गोष्टी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दाखवून त्यावर सीआयडी चौकशी करुन कारवाई केली गेली पाहिजे, असं स्पष्ट पत्र लिहिलं होतं. याची पूर्ण माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली होती. त्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. संपूर्ण डेटा हा 3.6 जीबीचा डेटा आहे. मुख्यमंत्र्यांकडून हा रिपोर्ट गृहमंत्र्यांकडे देण्यात आली. पण जेव्हा हे लक्षात आलं की यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही', असा आरोप फडणवीसांनी केला.
त्यानंतर कारवाई झाली ही रश्मी शुक्ला यांच्यावरच. शुक्ला यांची बदली करण्यात आली. त्यांना डीजी करण्याऐवजी त्यांच्या कनिष्ठांना पदोन्नती दिली. डीजी सिव्हील डिफेन्सचं पद दिलं जे अस्तिवातच नव्हतं. 25 ऑगस्ट 2020 पासून अत्यंत संवेदनशील प्रकरणावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ज्यांची नाव या पत्रात आहे, त्यांना त्याच ठिकाणी बदली करण्यात आली आहे, असा आरोपही फडणवीसांनी केला.
'या अहवालामध्ये अनेक पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाव आहे. अनेक आयपीएस अधिकारी आहे. याची माहिती मी जाहीर करू शकत नाही. कारण हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. मी या पत्रकार परिषदेनंतर दिल्लीला जाणार आहे. केंद्रीय गृह सचिवांकडे याची माहिती देणार आहे आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करणार आहे', असंही फडणवीसांनी स्पष्ट केले.
कारमायकल रोड स्फोटकं प्रकरणी अनेक गोष्टी बाहेर आल्या आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात लिहिले आहे. शरद पवार यांनी हा विषय राष्ट्रीय केला आहे. शरद पवार यांनी 1 ते 15 फेब्रुवारी अनिल देशमुख हे नागपूरमध्ये होम क्वारंटाइन होते असा दावा केला आहे. पण, अनिल देशमुख हे 15 तारखेलाच विमानाने गेले होते, असा आरोप फडणवीसांनी केला.
'पोलिसांकडे कुणी कुठे जाणार काय करणार याबद्दल नोंद असते. 17 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख हे सह्याद्री अतिथी गृहावर आले होते. 24 फेब्रुवारी रोजी पुन्हा अनिल देशमुख यांनी कारने प्रवास केला होता. अशी नोंद आहे, पण त्यांनी प्रवास केला की, नाही यावर मी बोलणार नाही. शरद पवार यांना योग्य माहिती दिली गेली नाही. त्यांच्या तोंडातून खोटी माहिती देण्यात आली आहे. क्वारंटाइनच्या काळात अनिल देशमुख हे अनेक लोकांना भेटले होते, असा आरोपही फडणवीसांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.