मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

देवेंद्र फडणवीस यांनीच 'ठाकरे सरकार' कोसळणार म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना फटकारले

देवेंद्र फडणवीस यांनीच 'ठाकरे सरकार' कोसळणार म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना फटकारले

फाईल फोटो

फाईल फोटो

गेल्या काही दिवसांपासून अनेक भाजप नेते ठाकरे सरकारवर निशाणा साधत भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा करत होते.

मुंबई, 1 सप्टेंबर : महाविकास आघाडीचं लवकरच विसर्जन होणार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) पुन्हा मुख्यमंत्री होणार असं सातत्यानं भाकीत करणाऱ्या स्वपक्षीयांचे स्वत: फडणवीसांनीच आज कान टोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक भाजप (BJP) नेते ठाकरे सरकारवर निशाणा साधत भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा करत होते. या नेत्यांना आता खुद्द विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच फटकारलं आहे. भाजप नेते आणि राज्यसभा खासदार राणे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यानंतर आज खासदार गोपाळ शेट्टी यांनीही फडणवीस लवकरच पुन्हा मुख्यमंत्री होणार असं भाकीत केल्याने अनेकांचे भुवया उंचावल्या. त्यामुळे सत्ता विसर्जनाचा मुहूर्त नेमका कधी काढायचा हे असे वक्तव्य करणाऱ्यांशी चर्चा करूनच ठरवणार असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी स्वकीयांना लगावला आहे. दहिसरमधल्या सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्य महोत्सवात ते बोलत होते. इतकंच नाही तर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी फडणवीस यांना गदा भेट दिली. त्यावर याचा प्रहार फक्त कोरोनाच्या लढाईसाठी करणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सध्या आमच्यासाठी कोरोना विरुद्धच्या लढाई महत्वाची असून सत्तेत येणं हा गौण भाग असल्याचं सांगत सर्व चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला. दरम्यान, कोरोना काळात ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. हे सरकार लवकरच जाईल, असा दावा नारायण राणे यांच्यासह भाजपचे इतर नेते वारंवार करत होते. मात्र आता फडणवीस यांनीच कान टोचल्यानंतर तरी हे नेते याबाबतचं भाष्य करणं टाळणार का, हे पाहावं लागेल.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Uddhav thackeray

पुढील बातम्या