Home /News /mumbai /

'नाराजी नाही, पंकजा आमच्या सिनियर नेत्या, त्या सर्वच पदांसाठी पात्र', देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान?

'नाराजी नाही, पंकजा आमच्या सिनियर नेत्या, त्या सर्वच पदांसाठी पात्र', देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान?

देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे सर्वच पदांसाठी पात्र असल्याचं विधान केलं. त्यामुळे विधानपरिषदेच्या 10 जागांसाठीच्या आगामी निवडणुकीत कदाचित पंकजा यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    मुंबई, 27 मे : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला निवडणूक (MLA Election 2022) होणार आहे. या निवडणुकीत कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे पंकजा यांचं नाव याआधीदेखील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चर्चेत आलं होतं. पण त्यावेळी भाजपकडून त्यांना संधी देण्यात आली नव्हती. आतादेखील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीत तरी त्यांना संधी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंकजा यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळावी का? याबाबत त्यांनी आज मोठं विधान केलं. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील पंकजा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पात्र असल्याचं विधान केलं. त्यामुळे विधानपरिषदेच्या 10 जागांसाठीच्या आगामी निवडणुकीत कदाचित पंकजा यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? "पंकजा मुंडे यांच्याबद्दल नाराजी वगैरे नाही. पंकजा आमच्या सिनियर नेत्या आहेत. ज्यावेळी एखादी निवडणूक येते त्यावेळेस त्यांचं नाव चर्चेत येणं हे साहजिक आहे. त्यामुळे त्यात काही वावगं नाही. कारण त्या कोणत्याही पदाकरता एलिजिबलच आहेत. त्या संदर्भातील निर्णय हायकमांडला घ्ययाचा आहे. आमच्या सर्वांकडून त्यांच्या नावाला पूर्णपणे सकारात्मक पाठिंबा आहे. त्या आणि आमचे हायकमांड दोन्ही मिळून या संदर्भात निर्णय घेतील", अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. पंकजा यांचं नेमकं विधान काय? "मी विधान परिषदेत जावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत माझी अशी कुणाशी चर्चा नाही. प्रत्येकवेळी निवडणूक आली की माझ्या नावाची चर्चा होते. आता हा पायंडा पडलेला आहे. पण माझी अशी कुणाशीही चर्चा झालेली नाही. अनेक नावं येत आहेत. माझ्या एकटीचं नाव पुढे येत नाहीय. अनेक जागा आहेत. पक्ष जो निर्णय घेईल ते निर्णय झाल्यावरच कळेल", अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली आहे. (नवनीत राणांच्या तक्रारीची दखल, राज्यातल्या बड्या अधिकाऱ्यांना नोटीस, दिल्लीत फैसला होणार) 'संभाजीराजेंची कोंडी केली गेली', फडणवीसांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेबाबत मांडलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. "खरं म्हणजे संभाजीराजेंची कोंडी करण्यात आली. शरद पवारांना नीट माहित होतं की यावेळची जागा त्यांच्याकडे नाही. त्यांच्या कराराप्रमाणे ती जागा शिवसेनेकडे आहे. तरीही त्यांनी जाणीवपूर्वक आम्ही संभाजीराजेंना पाठिंबा देऊ, आमची अधिकची मते देऊ, असं सांगून एक चित्र निर्माण केलं. त्यानंतर सांगितलं, अरे आमच्याकडे तर जागाच नाहीत. आम्ही शिवसेनेला सांगू. त्यावर शिवसेनेने संभाजीराजेंना मदत करायला तयार असल्याचं म्हटलं", असा दावा फडणवीसांनी केला. "संभाजीराजेंनी पहिल्याच दिवशी म्हटलं होतं की आपण कोणत्याही पक्षाकडून लढणार नाही. पण सर्व पक्षांनी पाठींबा द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. पण त्यांच्याशी चर्चा करुन बाहेर बातम्या सोडल्या. बारा वाजता संभाजीराजे शिवबंधन बांधण्याकरता येणार. पण त्यानंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा फोन उचलला नाही. माझाही उचलला नव्हता. संभाजीराजेंचा फोन उचलेला नाही. मला असं वाटतं की, काही नवीन घडलेलं नाही. दरवेळी हे असेच वागतात. त्यानंतर शिवसेनेच्यावतीने विक्टिम कार्ड प्ले केलं जातं. मात्र, ठरवून संभाजीराजेंची कोंडी करण्यात आली. आता हे स्पष्ट झालं आहे. ही बाब संभाजीराजेंनीच स्पष्ट केलं आहे. मला संभाजीराजे भेटायला आले होते. त्यांनी मला हे सांगितलं होतं की, सगळे मला समर्थन देतील. तुम्ही मला समर्थन द्या. मी कुठल्याही पक्षाकडून उभं राहणार नाही. मी त्यांना अतिशय स्पष्ट सांगितलं होतं की, सगळे तयार असतील तर मी आमच्या हायकमांडशी नक्की बोलेन. पण त्यानंतर काय घडलं ते आपण सगळ्यांनी बघितलं", अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या