भाजपवर देवेंद्र फडणवीसांची पकड मजबूत, स्पर्धकांना दूर ठेवण्यात मिळालं यश

भाजपवर देवेंद्र फडणवीसांची पकड मजबूत, स्पर्धकांना दूर ठेवण्यात मिळालं यश

एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या नेत्यांना कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून स्थान दिलं आहे. पण हे स्थान म्हणजे राज्यातलं केंद्रासारखं हे राज्यातले मार्गदर्शक मंडळ असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

  • Share this:

मुंबई 3 जुलै: भारतीय जनात पक्षाने (Bharatiya janata party) आज नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. आजच्या कार्यकारणित प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करणाऱ्यांना महत्त्वाचे स्थान नसेल हे पक्षाने स्पष्ट केलंय. या यादीवर पूर्णपणे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा प्रभाव असल्याचंही यादीवर नजर टाकल्यावर स्पष्ट होतंय. एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या नेत्यांना कार्यकारणीत विशेष निमंत्रित म्हणून स्थान दिलंय खरं. पण हे स्थान म्हणजे राज्यातलं केंद्रासारखं हे राज्यातले मार्गदर्शक मंडळ असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तर पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना केंद्रात संधी मिळणार असं म्हणत राज्यात त्यांना स्थान नसणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

पंकजा यांच्या बहिण प्रीतम मुंडे यांना उपाध्यक्ष पद देऊन मुंडे कुटुंबियांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. तर एकनाथ खडसे यांच्या सून आणि खासदार रक्षा खडसे यांना चिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंना बाजूला करतानाच त्यांच्याच घरात संधी देत असल्याचंही पक्षानं दाखवून दिलं आहे. आता यानंतर खडसे नेहमीप्रमाणे टीकेचे आसूड ओढणार की आहे ती परिस्थिती मान्य करणार हे महत्त्वाचं ठाकरणार आहे.

याशिवाय पुण्यातील पक्षाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनाही या कार्यकारणीत स्थान नाहीये. कुलकर्णी यांच्या कोथरुड विधानसभा मतदार संघातून गेल्या वर्षी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्या नाराज होत्या. नंतर या वर्षी झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही त्यांना संधी दिली नव्हती. त्यावर त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली होती. हा प्रकार पक्षात अजिबात आवडलेला दिसत नाहीये. त्यामुळेच त्यांना कार्यकारणीत फक्त सदस्य म्हणून स्थान देण्यात आलंय.

संबंधित - भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर: पंकजा मुंडेंना केंद्रात जबाबदारी

या उलट पक्षाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिल्यानंतरही पक्षाविरोधात कोणतीही नाराजी न व्यक्त करणारे, विधान परिषदेत संधी न मिळाल्यानं अजिबात खळखळ न करणारे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सरचिटणीस पदी संधी देण्यात आली आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनाही पक्षाचं उपाध्यक्ष पद देण्यात आलं आहे.

या यादीवर नजर टाकल्यास गेल्या वर्षी पक्षात प्रवेश केलेल्या चित्रा वाघा यांच्याशिवाय पक्षात नुकताच प्रवेश केलेल्यांपेक्षा अनेक वर्षं पक्षात काम करत असलेल्यांनाच या कार्यकारणीत महत्वाचं स्थान दिलं असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे गेल्या वर्षीचा मेगा भरतीचा पक्षाचा सोस ओसरला असून निष्ठावंतांनाच या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

विधानसभेत डावललेले कल्याण - डोंबिवलीचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना भटके विमुक्त मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच माजी आमदार आणि युवा मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर यांना ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्त करून तरुण चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. लातूर मधून तिकीट कापलेल्या सुधाकर भालेराव यांना अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी तर माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचे पुनवर्सन किसान मोर्चाच्या अध्यक्ष पदी नियुक्त करून केले आहे.

विशेष म्हणजे महिला मोर्चा अध्यक्ष पदासाठी पिंपरी चिंचवडमधून उमा खापरे आणि युवा मोर्चा अध्यक्षपदी पनवेलचे विक्रांत पाटील यांची निवड अनपेक्षित होती. कारण या दोन्ही पदांसाठी मेधा कुलकर्णी, चित्र वाघ, मनीषा चौधरी, भारती लवेकर आणि युवासाठी आमदार राम सातपुते यांची नावं चर्चेत होती.

हे वाचा - लडाखला पोहोचल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांमध्ये मोदींनी केलं ‘हे’ काम, पाहा VIDEO

पक्षानं प्रदेश कार्यसमितीत निमंत्रित सदस्य म्हणून पक्षाचे नेते नारायण राणे यांचा मुलगा नीलेश राणे यांनाही स्थान दिलं आहे. तर पक्षाच्या विशेष निमंत्रित यादीत नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, विजयसिंह मोहिते पाटील, उदयनराजे भोसले, हर्षवर्धन पाटील या गेल्याच वर्षी भाजपवासी झालेल्यांनाही स्थान देण्यात आलं आहे.

या यादीवरुन पक्षात जाहीरपणे नाराजी करण्याची कृती खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट संदेश पक्षाने दिला आहे. आणि सध्या सत्ता नसली तरीही देवेंद्र फडणवीस यांच्या राज्याची पक्षाची सगळी सूत्रं असतील हे पण पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

संपादन - अजय कौटिकवार

 

First published: July 3, 2020, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading