मुख्यमंत्र्यांनी नाणारबाबतचा उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द पाळला, घेतला 'हा' निर्णय

मुख्यमंत्र्यांनी नाणारबाबतचा उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द पाळला, घेतला 'हा' निर्णय

युतीची घोषणा करतेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द पाळला आहे.

  • Share this:

मुंबई, प्रफुल साळुंखे,  2 मार्च : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द अखेर पाळला आहे. नाणार प्रकल्प रद्द करत असल्याची अधिसुचना काढण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीकरता युती करताना 'नाणार रद्द करावा' अशी अट उद्धव ठाकरे यांनी ठेवली होती. नाणार प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला होता.

उद्धव ठाकरेंनी देखील कोकण दौऱ्यावेळी नाणार होऊ देणार नाही, शिवसेना भूमिपुत्रांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचं म्हटलं होतं. शिवाय, युतीच्या घोषणेवेळी देखील उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रश्नी आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी नाणार अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे.

जमिनी करणार परत

शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत करणार असल्याची घोषणा देखील, सुभाष देसाई यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 हजार हेक्टर तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 300 हेक्टर जमिनींच्या अधिग्रहणाची अधिसूचना काढली होती. पण, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत केल्या जाणार आहेत.

दरम्यान, नाणार रद्द झाल्याची घोषणा होत नाही तोवर विश्वास नाही ठेवणार, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी निवडणुकांपूर्वी नाणार रद्द करा अशी आग्रही मागणी केली होती. तर, नाणार व्हावा यासाठी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी नाणारला पाठिंबा असणाऱ्या लोकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी भूमिका स्पष्ट केली होती.

नाणारला स्थानिकांचा विरोध

राजापूर तालुक्यातील नाणार येथे होणाऱ्या तेल शुद्धीकरण कारखान्याला स्थानिकांनी विरोध केला होता. त्यासाठी मोर्चे, आंदोलनं देखील केली गेली. अधिवेशनादरम्यान नागपूरमध्ये देखील स्थानिकांनी मोर्चा काढत आपला विरोध दर्शवला होता. अखेर स्थानिकांच्या लढ्याला यश आलं आहे. नाणार प्रश्नी नेमलेल्या सुकथनकर समिती समोर देखील स्थानिकांनी आपला विरोध दर्शवला होता. तर, नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं देखील नाणारला आपला विरोध कायम ठेवला होता.

नाणारची घोषणा झाल्यापासून स्थानिकांनी त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. शिवसेनेनं देखील स्थानिकांना आपला पाठिंबा दर्शवला होता. अखेर जनभावना लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी नाणार रद्द करत असल्याची घोषणा केली आहे.

====================================

First published: March 2, 2019, 6:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading