राज ठाकरेंसोबत भेटच झाली नाही, देवेंद्र फडणवीसांनी केला 'मनसे' दावा

राज ठाकरेंसोबत भेटच झाली नाही, देवेंद्र फडणवीसांनी केला 'मनसे' दावा

मनसे आणि आमची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे तूर्तास तरी आमची युती होण्याची कोणती शक्यता नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

  • Share this:

मुंबई,9 जानेवारी:मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत परवा कोणतीही बैठक झाली नाही किंवा त्यांची भेटही झाली नाही, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आमच्या भेटीगाठी होत असतात. पण, परवा मात्र राज ठाकरेंसोबत भेट झाली नसल्याचा चक्क दावा देवेंद्र फडणवीस यांनी दैनिक 'लोकमत'च्या 'सरपंच ऑफ द ईयर' या कार्यक्रमात केला आहे. मनसे आणि आमची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे तूर्तास तरी आमची युती होण्याची कोणती शक्यता नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, भविष्यात त्यांची भूमिका बदलली तर विचार करता येईल, असे संकेतही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समिकरणांची जुळवणी होणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे भेटल्याच्या चर्चेने खळबळ उडाली होती. त्यामुळे सगळ्याचे लक्ष राजकारणातील नव्यया समिकरणाकडे लागले होते. देवेंद्र फडणवीसांच्या या दाव्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने मनसे एकटी पडली होती. तर भाजपलाही नव्या सवंगड्याची गरज होती यातून भाजप आणि राज ठाकरे जवळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अजित पवार म्हणाले, ज्या ठिकाणी राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना भेटले त्याच ठिकाणी मीही राज ठाकरेंना भेटलो होतो. पण त्या दोघांच्या भेटीत नेमके काय झाले ते माहीत नाही, असेही अजित पवार म्हणाले होते.

गेल्या काही वर्षांपासून भाजपवर तुटून पडणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नवी भूमिका घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती पुढे आली होती. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुढच्या वाटचालीत ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात होती. मुंबईत या दोनही नेत्यांमध्ये दीड तास खलबतं चालल्याची माहिती समोर आली होती.

दुसरीकडे, 23 तारखेला मुंबईत मनसेचे महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाची नवी भूमिका ठरविणार आहेत. गेली काही वर्षे राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तर त्यांनी जाहीर सभांमधून व्हिडीओ दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती.

आता महाराष्ट्रातली परिस्थिती बदलल्याने राज ठाकरे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेल्याने मनसेची कोंडी झाली होती. कारण मनसेने विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला साथ देणारी भूमिका घेतली होती. विधानसभेत सध्या मनसेचा एक आमदार आहे. या बदलत्या राजकारणाचा भाग म्हणून मनसे आपला झेंडाही बदलविणार असून हिंदुत्वाची कास धरण्याची शक्यता आहे.

मनसेचा झेंडा बदलणार

येत्या 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन मुंबईत होत असून त्यात राज ठाकरे पक्षाचे नवे धोरण जाहीर करणार आहेत. मनसेच्या राजकीय वाटचालीत हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार असून मनसेला हा बदल यश मिळवून देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.सध्याच्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग आहेत तर मध्ये पक्षाचं चिन्ह असलेलं इंजिन आहे. नव्या झेंड्यात सर्व चारही रंग जाणार असून फक्त भगवा रंग असणार आहे आणि मध्यभागी 'शिवराजमुद्रा' असणार आहे. हा बदल म्हणजे मनसेची हिंदुत्वाकडे असलेली वाटचाल असल्याचे म्हटले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2020 02:12 PM IST

ताज्या बातम्या