Home /News /mumbai /

सर्वात महत्त्वाची बातमी, ताज हॉटेलमध्ये नेमकी खलबतं काय? EXCLUSIVE माहिती समोर

सर्वात महत्त्वाची बातमी, ताज हॉटेलमध्ये नेमकी खलबतं काय? EXCLUSIVE माहिती समोर

शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार आज मुंबईत दाखल झाले. मुंबईच्या ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये भाजप आणि आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती समोर आली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 2 जुलै : शिवसेना (Shiv Sena) आणि बंडखोर आमदारांची (Shiv Sena Rebel MLAs) आज मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्व आमदारांना संबोधन केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांचं स्वागत केलं. "आपण आता पुन्हा एकत्र आलो आहोत. आपल्यासोबत आलेले हे बाळासाहेबांचे सच्चे सैनिक आहेत. बाळासाहेबांचा खरा विचार घेऊन जे सोबत आले, त्यांना बळ देणे ही आपली जबाबदारी आहे", असं संबोधन देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे या बैठकीत उद्या होणाऱ्या विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसदंर्भात रणनीती आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपा-सेना युतीच्या संयुक्त बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे "भाजपा-सेना वेगळी होती, असे इतके वर्ष कधी वाटले नाही. दरम्यानच्या काळात थोडे दूर गेल्यासारखे झाले. पण आता पुन्हा एकत्र आलो आहोत. मूळ परिवार एक झाला आहे. आपल्यासोबत आलेले हे बाळासाहेबांचे सच्चे सैनिक आहेत. बाळासाहेबांचा खरा विचार घेऊन जे सोबत आले, त्यांना बळ देणे ही आपली जबाबदारी आहे. आता एकत्र वाटचाल आपल्याला करायची आहे. महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव आपल्याला सर्वांना मिळून प्राप्त करून द्यायचे आहे", असं देवेंद्र फडणवीस आमदारांना उद्देशून म्हणाले. यावेळी 'भाजपा-सेना युतीचा विजय असो' च्या घोषणा झाल्या. भाजपा-सेना युतीच्या संयुक्त बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेले मुद्दे: "आज खऱ्या अर्थाने भाजपा-सेना युतीचे सरकार आले, याचे चित्र डोळ्यापुढे आहे. बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिले, ते पूर्ण झाले आहे. दरम्यानच्या सरकारच्या काळात वीर सावरकर यांचा अपमान, दाऊद संबंधाचा आरोप झालेल्या मंत्र्याचा बचाव, हे सारे अस्वस्थेचे विषय बनत चालले होते. शिवसेनेचे अधिक नुकसान होतेय हे पाहणे त्रासदायक होते", असं एकनाथ शिंदे म्हणाले. (BREAKING : शिवसेनेच्या व्हीपला एकनाथ शिंदेंचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले....) "नेतृत्वाला सांगण्याचे प्रयत्न खूप झाले, पण दुर्देवाने त्यात यश आले नाही. म्हणून आजची स्थिती निर्माण झाली. आपण मतदारांना न्याय देऊ शकलो नाही. तर आपल्या आमदारकीचा उपयोग काय? हाच सर्वांचा विचार होता. येत्या वर्षभरात अडीच वर्षाच्या कामाचा अनुशेष भरून काढू, देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेतच. त्यांना कामाचा अनुभव प्रचंड आहे. कठीण कामे सोपी कशी करायची हे त्यांना ठावूक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांनी दिली. त्यांचा आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा सुद्धा मी आभारी आहे", असं शिंदे म्हणाले. दरम्यान, शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर आमदार आज दुपारी साडेचार वाजता गोव्याहून मुंबईच्या (Mumbai) दिशेला रवाना झाले होते. गोव्याच्या ताज हॉटेलमधून आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची बस विमानतळाच्या दिशेला रवाना झाली होती. त्यानंतर ते विमानतळात दाखल झाले. या सर्व आमदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील आहेत. सर्व आमदार विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते विमानात बसले आणि मुंबईच्या दिशेला रवाना झाले. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले. या आमदारांच्या विमानात बसतानाचा पहिला व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत आमदार विमानात आसनस्थ होताना दिसत आहेत. त्यानंतर आता या आमदारांचा मुंबई विमानतळावरुन ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेला जाणारा व्हिडीओ समोर आला होता. शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपचे शिष्ठमंडळ मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. यामध्ये आमदार प्रसाद लाड यांचादेखील समावेश होता. विमानतळाबाहेर पाच बस उभ्या होत्या. या सर्व बसमध्ये भाजपचे आमदार होते. शिंदे गटाच्या आमदारांना घेऊन या पाचही बस ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या दिशेला रवाना झाल्या. ताज हॉटेलमध्ये त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या