संतापजनक: मुंबई महापालिकेच्या या हॉस्पिटलमध्ये मांजरीने खाल्ले भ्रूण

संतापजनक: मुंबई महापालिकेच्या या हॉस्पिटलमध्ये मांजरीने खाल्ले भ्रूण

कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर

  • Share this:

मुंबई,29 नोव्हेंबर:मुंबई महापालिकेच्या केईएम हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये मांजरीने मानवी भ्रूण खाल्ल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच अडीच महिन्यांच्या प्रिन्स राजभर या बालकाचा हात कापावा लागला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या आठवडाभरातच त्याचा मृत्यू झाला होता.

काय आहे हे प्रकरण?

केईएम हॉस्पिटलच्या गेट नंबर 7 जवळ बायोमेडिकल वेस्ट रुम आहे. या रुममध्ये मृतदेहांच्या कापलेल्या अवयव योग्य पद्धतीने पॅकिंग करुन ठेवले जाते. त्याच रुममध्ये हे मृत भ्रूण पॅक करुन ठेवले होते. पण, केईएममध्ये असलेल्या मांजराने हे भ्रूण पळवले आणि प्लास्टिक पॅकिंग फाडून भ्रूणच्या डोक्याचा भाग फस्त केला. बायोवेस्ट वाहनातून पडलेले मृत मानवी भ्रूण मांजरीने खाल्ल्याचे स्पष्टीकरण केईएम हॉस्पिटलकडून देण्यात आले आहे. तसेच, याबाबत न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपास सुरू असून याचा अहवाल सादर केला जाईल, असे ही सांगण्यात आले आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी एडीआर दाखल केला आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

बायोमेडिकल वेस्ट या रुमकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली होती. पण,बायोमेडिकल वेस्ट कचरा भरलेल्या वाहनामधून मानवी भ्रूण खाली पडले आणि ते मांजराने पळवल्याचे केईएम प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

2 महिन्यांच्या प्रिन्सचा अखेर मृत्यू

दरम्यान, केईएम हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे ईसीजी मशीनच्या आगीत हात गमावलेल्या दोन महिन्यांच्या प्रिन्स राजभर काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवल्याचे प्रशासनाने सांगितले.

उत्तर प्रदेशहून आलेल्या प्रिन्स राजभर याला केईएम रुग्णालयात हृदयावर उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना गेल्या 7 नोव्हेंबरला ईसीजी मशिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन गादीने पेट घेतला होता. त्यात प्रिन्सचा हात, कान, डोके आणि छातीचा भाग भाजला होता. त्याच्या हातावरील जखम मोठी होती. गँगरिन झाल्यामुळे बाळाचा हात कापण्याची वेळ आली होती. मात्र, तरी प्रिन्सला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नसल्याची माहिती केईएम हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

दरम्यान, प्रिन्सचे वडील पन्नेलाल राजभर यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात विद्युत उपकरणांचा सांभाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

First published: November 29, 2019, 2:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading