मुंबई, 23 फेब्रुवारी : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar यांचा मुंबईच्या हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू (Dadra nagar haveli MP suicide case) झाल्याने खळबळ उडाली होती. आता पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालं आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डेलकर यांच्या शवविच्छेदन अहवालात श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची नोंद आहे. फास लागल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्याने पोलीस आता आत्महत्येच्या कारणाचा तपास करत आहेत.
खासदार मोहन डेलकर हे अपक्ष खासदार म्हणून दादरा नगरहवेली मतदासंघातून लोकसभेवर निवडून गेलेले होते. ते या भागातून 7 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. अशा ज्येष्ठ नेत्याने अचानक मुंबईत येऊन आत्महत्या करण्यामागे काय कारण असावं याबाबत गूढ वाढलं आहे. डेलकर मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरातल्या आलिशान हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबले होते. त्यांच्याजवळ मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही सुसाइड नोट गुजरातीत लिहिलेली आहे आणि तब्बल 15 पानांची ही चिठ्ठी आहे. या चिठ्ठीत अनेक मोठ्या नावांचा उल्लेख असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे खासदारांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणातलं गूढ वाढलं आहे. या आत्महत्येमागे काय कारण असावं या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
पाहा - 15 दिवसांपासून गायब असलेल्या संजय राठोड आले समोर, मंदिरातला पहिला VIDEO
खासदार डेलकर यांना कोणी ब्लॅकमेल करत होतं का, ते नैराश्यात होते की आणि आणखी काही कारण, यामध्ये राजकीय वैमनस्याचा किंवा कौटुंबिक कलहाचा भाग आहे का या सर्व बाजूंनी मुंबई पोलीस तपास करत आहेत.
1989 मध्ये पहिल्यांदा ते निवडून आले आणि खासदार झाले. त्यानंतर भारतीय नवशक्ती पार्टीकडून ते निवडणूक लढले. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पण त्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. 2019 ची निवडणूक ते अपक्ष म्हणूनच लढले होते आणि जिंकले होते. सात वेळा खासदार म्हणून निवडून गेलेल्या लोकसभा सदस्याचा असा संशयास्पद रीत्या म-मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.