मुंबई, 14 जून : अरबी समुद्रात घोंघावणारं चक्रीवादळ वायू गुजरात किनाऱ्यावर धडकलं नाही. या वादळाचा धोका कमी झाला असला, तरी टळलेला नाही. कारण अरबी समुद्रातच हे वादळ अजूनही घोंघावतं आहे. PTI ने दिलेल्या बातमीनुसार पुन्हा एकदा या वादळाने दिशा बदलून ते पश्चिमेकडे सरकायला लागलं आहे. हे वादळ कच्छच्या दिशेनं सरकतं आहे. त्यानंतर ते पुन्हा आग्नेयेकडे सरकण्याचा धोका आहे. त्यामुळे गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर हाय अॅलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातसुद्धा जाणवू शकतो. मुंबई आणि परिसरात या वादळामुळे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुढचे 24 तास महत्त्वाचे
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी वायू चक्रीवादळासंदर्भात केलेल्या तयारीचा आढावा घेणारी बैठक घेतली. गुजरातमध्ये वादळाचा धोका कायम असल्याने या बैठकीत यंत्रणांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. पुढचे 24 तास त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. स्थानिक प्रशासन आणि NDRF च्या तुकड्यांना तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वादळाच्या प्रभावाखाली येणाऱ्या सर्व 10 जिल्ह्यांमधल्या शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात येणार आहेत.
वायू चक्रीवादळाचा धोका असल्याने काही भागात रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दीव, सोमनाथ, जुनागढ आणि द्वारका भागाला या वादळापासून धोका आहे. पोरबंदर आणि परिसरात येणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
मान्सूनही लांबला
सध्या मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पडत असलेला पाऊस हा पूर्वमोसमी पाऊस आहे.
मुंबईकरांना मान्सूनसाठी आणखी 7 दिवस वाट पाहावी लागणार
मुंबई आणि किनारपट्टीवर वायू वादळाच्या प्रभावामुळे पाऊस बरसत आहे. या वादळाच्या प्रभावामुळे नैर्ऋत्य मान्सूनसचे वारे मात्र महाराष्ट्रात पोहोचायला उशीर होत आहे. आणखी एक आठवड्याने तरी मान्सूनचं आगमन लांबणार असा वेधशाळेचा अंदाज आहे.
हवामानाचा अंदाज
पुढच्या 24 तासांत मुंबई, ठाणे जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
समुद्रात बुडणाऱ्या तरुणाला वाचविणाऱ्या 'कोस्ट गार्ड'चा थरारक VIDEO
कोकण किनारपट्टीवरही समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे समुद्रकिनारी जाऊ नये. मच्छिमारांनी नौका समुद्रात घालू नयेत, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो. विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे. रविवार आणि सोमवारीही मुंबई परिसरात मोठा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
VIDEO : रुग्णालयात बाळाची काळजी घ्या, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद!