मुंबई 22 ऑक्टोबर: देशात सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत असून रोज नव नवीन सायबर गुन्ह्यांचे प्रकार समोर येत आहेत. असाच एक खळबळजनक प्रकार समोर आला असून मुंबईतल्या एका व्यापाराला 2 कोटींचा गंडा घातला गेल्याचं उघड झालं आहे. त्यांच्या बँक अकाउंटमधून तब्बल 2 कोटी रुपये हातोहात सायबर चोरांनी उडविल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील व्यापारी संजय मखिजा 3 ओक्टॉबरला सगळं काम पूर्ण करून ऑफिसमधून बाहेर पडले आणि घरी फोन करायला खिशातून मोबाईल काढला पण फोन काही लागत नव्हता. मोबाईलमध्ये पाहिले तर मोबाईला नेटवर्क त्यांना दिसले नाही. काहीतरी तांत्रिक अडचण आली असेल म्हणून संजय मखिजा यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं त्यांना चांगलंच महागात पडलं.
नंतर काही कामानिमित्त जेव्हा मखिजा यांनी नेटबॅकींगद्वारे आपलं बँकेचं अकाउंट चेक केले तेव्हा त्यांना धक्काच बसला. तोपर्यंत त्यांच्या खात्यातून तब्बल 32 वेळा पैसे काढले गेले होते. जी एकूण रक्कम 2 कोटींपेक्षा जास्त होती आणि हे सर्व झाले जेव्हा संजय मखिजा यांच्या मोबाईलला नेटवर्क नव्हते. संजय मखिजा यांनी तात्काळ सायबर पोलिसांनाकडे याची तक्रार नोंदवली.
संजय मखिजा यांच्या बँक खात्यातून 2 कोटी रुपये 32 वेळा केलेल्या व्यवहारांच्या माध्यमातून देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून काढून घेण्यात आले होते. या संदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केली असता संजय मखिजा यांच्या मोबाईल फोन मधील सिम कार्ड हे क्लोन करून ही फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र आपण कधीही आपले सीम कार्ड रद्द करण्यासाठी मोबाईल कंपनिकडे विनंती केली नसल्याचे संजय मखिजा यांनी सांगितले आहे.
राज्याचा Recovery Rate गेला 88 टक्क्यांच्या पुढे, COVID रुग्णांमध्ये घट कायम
या संबंधी सायबर क्राईमचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे बँकेत देखील आपले पैसे सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय. Online व्यवहार करताना काळजी घ्या असं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे. सध्या कोरोनामुळे डिजिटल व्यवहारांचं प्रमाण वाढलं आहे. त्याचाच फायदा घेत सायबर चोर हे पैसे लंपास करत आहेत. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त काळजी घ्या असं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे.