मुंबई, 22 सप्टेंबर : मुंबईची लाइफलाइन अर्थात मुंबईची लोकल कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी ठप्प आहे. लोकल सुरू करावी या मागणीसाठी मनसेचे आंदोलन पुकारले आहे. आज दुसऱ्या दिवशीही मनसे नेते आंदोलन करणार आहे.
सविनय कायदेभंग करत लोकलने प्रवास करणारे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे वरळी विभाग अध्यक्ष संतोष धुरी, अतुल भगत आणि गजानन काळे हे चौघे जण आज कर्जत येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर स्वतःहून हजर होणार आहेत.
काल लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आज हे चौघेही पोलिसांसमोर स्वतःहून हजर होणार आहेत.
संदीप देशपांडे यांच्यासह आंदोलन करणाऱ्या 3 पदाधिकाऱ्यांवर आपत्तीकाळात सरकारची कोणतीही परवानगी नसताना प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51, 52 तसंच महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2019 च्या कलम 11, त्यासह भारतीय रेल्वे अधिनियम 147, 153, 156 अंतर्गत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेता मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून चालवली जात आहे. पण, यामुळे चाकरमान्यांना अतोनात हाल सहन करावे लागत आहे. त्यामुळेच मुंबईतील लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी मनसेने केली होती.
लोकल सेवा बंद असल्यामुळे चाकरमान्यांना एसटी बस किंवा खासगी गाड्याने प्रवास करावा लागत आहे. ठाणे, वसई, विरार, डोंबिवली, बदालपूर, अंबरनाथ भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांना मुंबईत यावे लागते. पण लोकल सेवा बंद असल्यामुळे चार-चार तासांचा प्रवास करून बसने प्रवास करून ऑफिस गाठावे लागत आहे. काही ठिकाणी बसेसची व्यवस्थाच नसल्यामुळे चाकरमान्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. परंतु, मुंबईतील लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता आणि कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती असल्यामुळे लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.