मुंबई 18 डिसेंबर: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम आहे. नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी 4 हजार 467 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 17 लाख 78 हजार 722 एवढी झालीय. Recovery Rate 94.17वर गेला आहे. तर 3 हजार 994 नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ही 18 लाख 88 हजार 767 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासात 75 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.57 एवढा झाला आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र अजुनही धोका टळलेला नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर केल्यास संसर्ग टाळता येऊ शकतो हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेचे नियम पाळण्यात कुचराई न करता नियमांचं पूर्ण पालन करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच नागरिकांना केलं होतं.
मुंबई महापालिकेच्या वतीने आजपासून डॉक्टरांना लसीकरण संदर्भात प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली आहे. कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आणि जगभरात लशीवर संशोधन सुरू आहे.
भारतातही लशीची मानवी चाचणी सुरू आहे. प्रत्यक्ष लोकांना लसीकरण करण्यासाठी अजून केंद्र शासनाची परवानगी मिळालेली नाही. परंतु लवकरच लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. त्याच्या पूर्वतयारीमध्ये कोल्ड स्टोरेज आणि लसीकरणाचे प्रशिक्षण या दोन महत्त्वाच्या बाबी येत असल्याने मुंबई महापालिकेने दोन्ही बाबतीत आपली तयारी सुरू केली आहे.
नव्या वर्षात कोरोनाचा (Coronavirus) भर ओसरणार, देश कोरोनामुक्त होणार, अशी भविष्यवाणी चर्चेत होती. पण त्यात किती तथ्य आहे? केंद्रीय पातळीवर तयार करण्यात आलेल्या एक्सपर्टस पॅनेलने (Expert Panel) सुपर मॉडेलच्या (Super Model) आधारे असं म्हटलं आहे की, भारतीय प्रशासनाची उदासीनता आणि कोरोनाबाबत (Corona) अपेक्षित प्रमाणात चाचण्या करण्यासाठी पुरेशी क्षमता नसल्याने खरी परिस्थिती लक्षातच आलेली नाही. या पॅनेलच्या मते, फेब्रुवारी 2021 मध्ये देशात कोरोना मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आला असेल, पण धोका संपलेला नसेल.
या पॅनेलने त्यांच्या सुपर मॉडेलनुसार, फेब्रुवारी 2021 पर्यंत भारतातील कोरोना साथ जवळपास संपुष्टात येईल, असा अंदाज वर्तवला आहे. भारतात या कालवाधीनंतर कोरोना संसर्गाची लाट येण्याची शक्यता नाही. फेब्रुवारी 2021 मध्ये अक्टिव्ह केसेसची संख्या केवळ 20 हजारच राहील, कारण संसर्ग झाला आहे की नाही हे स्पष्ट होऊ न शकलेल्या केसेसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल.