Home /News /mumbai /

राज्यात आढळले 10 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, 258 जणांचा मृत्यू

राज्यात आढळले 10 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, 258 जणांचा मृत्यू

    मुंबई 23 ऑगस्ट: राज्यात रविवारी 10,441 नवे रुग्ण आढळून आलेत तर 258 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 6,82,383 एवढी झाली आहे. संख्या 7 लाखांच्या जवळ गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर आत्तापर्यंत 4,88,271 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 1,71,542 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा 71.55 एवढा झाला आहे. तर मृत्यू दर हा 3.26 एवढा आहे. दरम्यान, WHO च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनीही प्रौढांसारखे मास्क घालावे. संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने म्हटले आहे की मास्क घालण्यासाठी जगभरात जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही लागू आहेत. WHOने दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना मोठ्यांप्रमाणे कोरोनाचा धोका जास्त असतो. जेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही अशा ठिकाणी किंवा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असलेल्या ठिकाणी मुलांनीही मास्क घालावे. WHOने मुलांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याचेही सांगितले होते. WHOच्या मते, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले प्रौढांप्रमाणे कोरोना पसरवू शकतात. तर, 5 वर्षाखालील मुलांना मास्क घालणे अनिवार्य नाही. देशातल्या अनेक राज्यांमध्ये असलेले प्रवासी आणि माल वाहतूकीचे निर्बंध काढून टाका असा सल्ला केंद्राने राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर राज्यातल्या आंतर जिल्हा प्रवासासाठी असलेले नियम शिथिल होणार का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले. सध्या राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जातांना ई पासची गरज लागते. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सरकारची भूमिका स्पष्ट केली. अजित पवार म्हणाले, केंद्राचं त्याबाबतचं पत्र आलेलं असलं तरी प्रत्येक राज्याची भौगोलिक परिस्थिती ही वेगळी असते. याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करूनच घेतला जाणार आहे. त्यामुळे राज्यात सध्यातरी आंतरजिल्हा बंदी उठविण्यात येणार नाही असेच संकेत अजित पवारांनी दिले आहेत. राज्या सरकारने बसच्या आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी दिली आहे. मात्र खासगी वाहतुकीला मात्र बंदी असून ई पास गरजेची आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या