S M L

छगन भुजबळांना देशभरात कुठेही जाण्यास कोर्टाची परवानगी

Updated On: Sep 4, 2018 04:55 PM IST

छगन भुजबळांना देशभरात कुठेही जाण्यास कोर्टाची परवानगी

मुंबई, 04 सप्टेंबर :  मुंबई हायकोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा दिला आहे. भुजबळ यांना आता कोर्टाच्या पूर्व परवानगीशिवाय आता देशभरात कुठेही जाण्याची परवनागी देण्यात आली आहे. पण असं करताना त्यांना ईडीला पूर्वकल्पना देणं आवश्यक आहे. तसंच जात असलेल्या ठिकाणचा पत्ता आणि संपर्कासाठी फोन क्रमांक देणं मात्र बंधनकारक आहे.

या वर्षी ४ मे रोजी भुजबळ यांना जामीन देण्यात आला होता. त्यावेळेस त्यांना घालण्यात आलेल्या अटींपैकी एक अट म्हणजे मुंबईबाहेर जाताना त्यांना कोर्टाची पूर्व परवानगी बंधनकारक करण्यात आली होती. भुजबळ यांनी ती अट शिथील करण्यात यावी यासाठी अर्ज करताना आपण एक आमदार असून आपल्याला आपल्या राजकीय आणि  सामाजिक कार्यासाठी सतत मुंबईबाहेर जावं लागतं, तसंच आपातकालीन परिस्थितीत बाहेर जाण्याची वेळ येऊ शकते असं म्हटलं होतं.

तसंच आपण महात्मा फुले समता परिषदेचे सदस्य असून त्यासाठी राज्याबाहेर जावं लागतं असं म्हटलं. त्याशिवाय आपण यापूर्वी ८ वेळा कोर्टाची परवानगी घेऊन मुंबईबाहेर गेलो होतो याची माहितीही कोर्टाला दिली. तसंच आपल्याला अटक होण्यापूर्वी आपण परदेशात होतो आणि आपल्या विरोधात कारवाई सुरू आहे याची माहिती असतानाही आपण देशात परतलो होतो याचीही आठवण कोर्टाला करुन दिली.

आपण कायदेशीर प्रक्रियेपासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि त्यामुळेच आपला अर्ज मंजूर करण्यात यावा अशी विनंती कोर्टाला केली. ईडीनं मात्र भुजबळांच्या अर्जाला विरोध केला.

भुजबळ यांची राज्याबाहेरही मालमत्ता असून हा त्यांच्या विरोधात खटला सुरू असताना ते राज्याबाहेर पूर्वपरवानगी न घेता गेल्यास खटल्याला ते प्रभावित करू शकतात अशी शंका व्यक्त केली. पण कोर्टाने भुजबळांच्या वतीनं करण्यात युक्तीवाद आलेला युक्तीवाद मान्य करत त्यांना देशात पूर्वपरवानगीशिवाय प्रवास करण्यास मान्यता दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2018 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close