मुंबई 16 ऑगस्ट : पत्नी कमावती असल्याने पोटगीस नकार देणाऱ्या एका व्यक्तीला कोर्टाने खडे बोल सुनावले आहेत. पत्नी (Wife) ही पतीची (Husband) जबाबदारी असते आणि तो जे काही कमवतो त्यातून त्याने त्याच्या पत्नीला उदरनिर्वाहासाठी रक्कम देणं गरजेचं आहे, असं निरीक्षण मुंबईतील (Mumbai) सत्र न्यायालयाने नोंदवलं. त्याचबरोबर कोर्टाने एका 52 वर्षीय पुरुषाचा पत्नी कमवती असल्याने तिला पोटगी न देण्याचा युक्तीवाद फेटाळून लावला.
हे प्रकरण कौटुंबिक हिंसाचाराचं होतं. तसंच पत्नी आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, आपल्यापेक्षा जास्त कमवते, त्यामुळे तिला आपण पोटगी देणार नाही, असं त्या व्यक्तीचं म्हणणं होतं. फ्री प्रेस जर्नलच्या वेबसाईटवर याबाबतचं वृत्त देण्यात आलं आहे. या प्रकरणातील दाम्पत्याला दोन सज्ञान मुलं आहेत. हे दाम्पत्य 2015 पासून वेगळं राहू लागलं होतं. पत्नी आणि मुलं घाटकोपर येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतात, तर ही व्यक्ती ट्रांझिट कॅम्पमध्ये राहत आहे. त्यांचं घरगुती हिंसाचाराचे प्रकरण कोर्टात असताना विक्रोळी दंडाधिकारी न्यायालयाने त्याला पत्नी आणि मुलांना खर्चासाठी 8 हजार आणि 8 हजार रुपये घरभाडं (Rent) देण्याचे आदेश दिले होते, याच आदेशाला त्याने आव्हान दिलं होतं.
वडिलांच्या निधनामुळे नोकरीची गरज, फेसबुक फ्रेंडने दिला धोका अन् तरुणीवर बलात्कार
या व्यक्तीने आपल्या याचिकेत म्हटलं होतं की, त्याची पत्नी बिझनेस करते आणि ती कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवू शकेल इतकं पुरेसं कमवते. पोटगी देण्याची तरतूद ही पूर्णपणे पतीच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या महिलांसाठी आहे, कमवणाऱ्या महिलांसाठी नाही, असा युक्तिवाद त्याने केला होता. तसंच माझी पत्नी एका पॉश सोसायटीत दरमहा 26,000 रुपये भाडं भरून राहते आणि मी कॉमन टॉयलेट असलेल्या एका ट्रांझिट कॅम्पमध्ये राहतो. यावरून आमच्या दोघांमधील आर्थिक विषमता दिसून येते, त्यामुळे मी पोटगी देणार नाही, असंही पतीने म्हटलं होतं. तसंच पत्नीजवळ साताऱ्यात (Satara) शेतजमीन आणि घर असल्याचंही त्याने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं होतं.
दरमहिन्याचे 5 हजार घेईन; सासरी राहण्यासाठी पत्नीने घातली अट, पती Shocked!
या प्रकरणावर सुनावणी करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांनी नमूद केलं की 2015 पासून पतीने पत्नी आणि मुलांच्या राहण्याची किंवा देखभालीची व्यवस्था केलेली नाही. तसंच फक्त ती कमवती महिला असल्याच्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याच्या कारणास्तव जबाबदारी घेण्यापासून हात वर केले. तरीही तिने पोटगीचा दावा करू नये, हे योग्य नाही. केवळ ती कमवती महिला असल्याने तिचा उदरनिर्वाहाचा हक्क नाकारता येणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाचाही दाखला कोर्टाने दिला. ज्यानुसार पत्नी कमवती असली तरी तिला पोटगीचा अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं होतं. तसंच या व्यक्तीचा व्यवसाय असून त्याच्याजवळ इतर मालमत्ता असल्याचं सांगत पोटगीची रक्कम द्यावीच लागेल, असेही कोर्टाने आदेश दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Divorce, Wife and husband