ठाणे, 23 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर रविवारी जनता कर्फ्यू 100 टक्के यशस्वी करणाऱ्या ठाणेकरांनी आज मात्र आततायीपणा करत रस्त्यांवर गर्दी केली आहे. ज्यामुळे पोलिसांचा ताण तर वाढलाच आहे पण रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
ठाण्यातील नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शन इथं मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहने रस्त्यांवर जावू नये याकरता पोलीस खाजगी वाहनांना हात जोडून विनंती करत आहेत. असं असतानाही ठाणेकर विनाकारण मोठ्या संख्येने रस्त्यावर बाहेर पडताना दिसत आहेत.
थोड्यावेळात ठाण्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस उतरणार असून कलम 144 चे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला जाईल, असं एका वरीष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे वाहने रस्त्यावर न आणता घरात बसून राहणेच ठाणेकरांसाठी योग्य ठरणार आहे.
पुण्यात पोलिसांचा मोठा निर्णय
महाराष्ट्र सरकारने राज्यभरात कलम 144 लागू करण्याची घोषणा करत जमावबंदी केली आहे. मात्र तरीही लोक रस्त्यावर उतरत आहेत. अनेकजण शहरातून गावाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांखेरीज कुठलीच वाहने रस्त्यावर येणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे.
एकीकडे पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे, कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना राज्य सरकारने क्वारंटाइनमध्ये राहण्याचं आवाहन केलं आहे. कम्युनिटीमध्ये कोरोनाचा (Covid - 19) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी परदेशातून भारतात आलेल्यांना पुढील किमान 14 दिवस क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.