मुंबई, 26 जून : भारताचा Coronavirus चा हॉटस्पॉट म्हणून साऱ्या जगाचं मुंबईकडे लक्ष आहे. मुंबईत दररोज रुग्णसंख्या वाढत असली, तरी चाचण्यांचं प्रमाणही वाढत आहे. धारावीसारख्या झोपडपट्टी भागात सर्वाधिक धोका होता. तो आता नियंत्रणात आणला आहे. पण खरा धोका वाढतोय तो मुंबई महापालिकेबाहेरच्या उनगरांत. लोकसंख्येच्या तुलनेत या उपनगरांत कोरोनारुग्णांची संख्या धडकी भरवणारी आहे. विशेषतः कल्याण डोंबवली, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, भाईंदर आणि ठाण्यात परिस्थिती कठीण होत आहे.
'उपनगरांसह मुंबई महानगर भागात कोरोना चाचण्या नियंत्रित केल्या जात आहेत, तर दुसरीकडे बळीसंख्येत जुने दडविलेले मृत्यू रोज अधिक होत आहेत. स्वत: मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा समग्र आढावा घ्यावा आणि त्यावर उपाययोजना कराव्या', अशी मागणी करणारं पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं आहे. त्यात त्यांनी उपनगरातल्या संसर्गाची आकडेवारी दिली आहे.
कोरोना चाचणी केलेल्यांपैकी किती जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला यावरून संसर्गाचा दर ठरतो. कोरोना संसर्गाचा सर्वाधिक दर मुंबईत नव्हे तर बाजूच्या उपनगरांमध्ये आहेय सध्या भिवंडीमध्ये सर्वाधिक संसर्ग दर आहे.
संसर्ग दर (टक्क्यांमध्ये)
मुंबई 29.65
भिवंडी 48.55
पनवेल 45.69
मीरा भाईंदर 43.11
कल्याण-डोंबिवलीत 39.74
नवी मुंबई 36.40
ठाणे 29.94
पालघर, वसई, विरार 20.46
महाराष्ट्र हादरला! एकाच दिवसात विक्रमी 5024 जणांची वाढ, संख्या गेली दीड लाखांवर
देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या या आकडेवारीच्या पत्रात ते म्हणतात की, मुंबईत दि. 24 जून 2020 पर्यंत 2,99,369 इतक्या चाचण्या झाल्या होत्या, तर रूग्णसंख्या 69,528 इतकी होती. चाचण्यांच्या संख्येत संसर्गाचे प्रमाण हे 23.22 टक्के इतके होते. यातील 1 ते 23 जून या कालखंडात 97,872 चाचण्या करण्यात आल्या आणि त्यातून 29,017 रूग्ण आढळले, हा दर 29.65 टक्के इतका आहे. दि. 24 जून रोजीपर्यंत देशात 73,52,911 चाचण्या झाल्या होत्या, त्यापैकी 4,73,105 रूग्ण आढळून आले. संपूर्ण देशात संसर्गाचा दर 6.43 टक्के होता. दि. 24 जून रोजी आतापर्यंतच्या सर्वाधिक एका दिवशीच्या चाचण्या देशात याचदिवशी करण्यात आल्या. त्या 2,15,195 इतक्या होत्या. त्यातून 16,922 रूग्ण आढळून आले. संसर्गाचे प्रमाण 7.86 टक्के होते.
पुणे परिसरातील मोठ्या दुकानाला दणका, लॉकडाउनचे नियम मोडणं पडलं महागात
कोरोनाविरोधातील लढा हा आकडेवारीकेंद्रीत नको, तर कोरोनाकेंद्रीत हवा, असंही त्यांनी म्हटलं आहे. पण, तसं होताना दिसून येत नाही. कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात नियंत्रित केल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे. बळींची संख्या, संपूर्ण राज्याची फेरपडताळणी पूर्ण केल्यानंतरही दररोज जुने मृत्यू अधिक केले जाणे, यावर सुद्धा सविस्तरपणे त्यांनी पत्रात लिहिले आहे.
मृतदेहांची कोरोना चाचणी नाहीच
जागतिक आरोग्य संघटना WHO आणि आयसीएमआरचे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा मृतदेहांची कोरोना चाचणी बंद करण्याचा आदेश 19 जून रोजी काढण्यात आला. तो रद्द करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. वारंवारच्या आदेशांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. कोरोना पॉझिटिव्ह चाचणीचा अहवाल द्यायचा नाही, हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविला, म्हणून बरे झाले. पण, मुंबईत अनेक रूग्ण पळून जातात, ही सुद्धा गंभीर बाब आहे. शासन, प्रशासन म्हणून लोकांनी घाबरून जाऊ नये, म्हणून त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याची गरजही त्यांनी या सविस्तर पत्रातून नमूद केली आहे.
जुलै-ऑगस्टमध्ये कोरोना साथीचा विस्फोट? राज्यात युद्धपातळीवर सज्जतेच्या सूचना
दरम्यान, ठाण्यात शुक्रवारी ठाणे महापालिका क्षेत्रात 365 कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 7456 झाली आहे. एका दिवसात वाढलेली ही विक्रमी संख्या आहे.
संकलन - अरुंधती