मुंबई, 26 मार्च : राज्यात आणि देशातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचं संकट गडद होत असताना लोकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच मुंबईतून एक भयंकर प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊन असताना तू घराबाहेर का गेला होतास? असा प्रश्न विचारणाऱ्या लहान भावाची मोठ्या भावाने हत्या केल्याची घटना घडली आहे.
लॉकडाउनमध्ये मोठा भाऊ आणि वहिणी घराबाहेर भाजीपाला घ्यायला गेले. त्यानंतर घरी परत आल्यावर लॉकडाऊन असताना तुम्ही दोघे बाहेर का गेला होता? अशी विचारणा लहान भावाने केली. त्यावर 'तू आम्हाला शिकवू नकोस, काय करायचे आहे ते आम्हाला चांगले माहीत आहे,' असं बोलून मोठा भाऊ लहान भावाशी वाद घालू लागला,
हा वाद इतका विकोपाला गेला की मोठ्या भावाने घरातील लोखंडी तवा लहान भावाच्या डोक्यात मारला. ज्यामध्ये लहान भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पशुपतीनाथ दुबे चाळ, सिद्धी विनायक मैदानाजवळ, गावदेवी रोड, पोयसर कांदिवली पुर्व मुंबई येथे घडली असून यामुळे कांदिवलीत एकच खळबळ उडाली आहे. दुर्गेश लक्ष्मी ठाकूर वयं 21 वर्षे हे खून झालेल्या लहान भावाचे नाव असून दुर्गेशच्या हत्येप्रकरणी त्याच्या 28 वर्षीय मोठ्या भावाला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईमध्ये प्रभादेवी भागामध्ये एका महिला फेरीवाली कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या एका कॉर्पोरेट ऑफिसजवळ ही महिला भोजन विक्रीचा व्यवसाय करत आहे. असं वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.