कंटाळवाण्या 'लॉकडाऊन'मध्ये तग कसा धरायचा? अमित ठाकरेंनी दिल्या टिप्स

कंटाळवाण्या 'लॉकडाऊन'मध्ये तग कसा धरायचा? अमित ठाकरेंनी दिल्या टिप्स

'सध्या प्रदूषण जवळजवळ नाही, आवाज नाहीत त्यामुळे पक्ष्यांचे आवाज, इतकंच काय स्वतःच्या श्वासाचा आवाज पण ऐकून बघता येईल.'

  • Share this:

मुंबई 22 मार्च : कोरोनामुळे सगळं जगचं थांबून गेलंय. चीन, इटली आणि युरोपातले अनेक देश सध्या लॉकडाऊन आहेत. भारतातही याला सुरुवात झालीय. कधीही न थांबणारी मुंबईसुद्धा थांबली आहे. सगळ्यांनाच घरात राहावं लागतंय. संकटातही संधी आहे असं म्हणतात. त्यामुळे या लॉकडाऊनचा चांगला उपयोग करून घेता येऊ शकतो असं मत मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी Facebook पोष्टमध्ये मांडलं आहे. लॉकडाऊनच्या काळात काय काय करता येऊ शकते याच्या टिप्सही त्यांनी दिल्या आहेत.

अमित ठाकरे म्हणतात की,

#lockdown ला सगळे जण जो प्रतिसाद देत आहेत, स्वतःच्या, दुसऱ्यांच्या आयुष्याविषयी जी काळजी दाखवत आहेत त्याबद्दल सगळ्यांना हॅट्सऑफ !

आत्ताच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी, सध्या ह्या पेक्षा दुसरा कुठला उपाय पण नाहीये त्यामुळे ह्याकडे सकारात्मक बघायचं ठरवलं तर...

कधी कधी असा लादलेला 'लॉकडाऊन' पण चांगला असू शकतो .

तुम्हाला घरच्यांशी बोलायची संधी मिळाली आहे.

खूप महिन्यांपूर्वी विकत घेतलेल्या योगा मॅटवरची धूळ झटकता येईल.

त्या पुस्तकांना हात लागेल जी खूप महिने आपली वाट पाहत असतील.

किचनमध्ये जाऊन मास्टरशेफ होता येईल.

सध्या प्रदूषण जवळजवळ नाही, आवाज नाहीत त्यामुळे घड्याळाची टिकटिक, पक्ष्यांचे आवाज, इतकंच काय स्वतःच्या श्वासाचा आवाज पण ऐकून बघता येईल.

जीवसृष्टीतील लाखो जीव पण मोकळा श्वास घेत असतील कारण आपण त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही आहोत.

तुम्हाला ह्या काळात ते सगळं करता येईल जे आजपर्यंत तुम्ही कधीच केलं नसेल आणि हो, आपण सगळ्यांनी जर हे सहज स्वीकारलं तर इतरांचं आयुष्य कायमचं 'लॉकडाऊन' होण्यापासून थांबवता येईल.

आणि हो ह्या काळात न थांबता, न थकता काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, महाराष्ट्र पोलीस, इतर इमर्जन्सी सेवांसाठी काम करणारे कर्मचारी आणि न्यूजपेपर, टीव्ही चॅनेल्सच्या टीममधील सगळ्यांचे मनापासून आभार.

First published: March 22, 2020, 10:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading