Home /News /mumbai /

मुंबईमध्ये दुकाने सुरू करण्यास परवानगी, काय सुरू...काय राहणार बंद? जाणून घ्या

मुंबईमध्ये दुकाने सुरू करण्यास परवानगी, काय सुरू...काय राहणार बंद? जाणून घ्या

महानगरपालिका प्रशासनानेही सकारात्मक पाऊल उचलून मंडया सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

    मुंबई, 24 जून : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील मंडयांमध्ये जीवनावश्यक वस्तुंची विक्री पूर्वीपासूनच सुरु असून त्यासोबत आता इतरही वस्तू, साहित्य विक्रीची दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंडयांमधील दोन्ही बाजूस असलेली दुकाने सम-विषम तारखेस आळीपाळीने सुरु करताना व दैनंदिन व्यवहार करताना व्यापारी, विक्रेते, ग्राहक यांच्यासह सर्वांनी कोविड 19 संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. त्यादृष्‍टिने सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान असे असले तरी, विविध विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये घोषित प्रतिबंधात्मक क्षेत्र लक्षात घेता त्या भागातील मंडया सुरु ठेवाव्यात किंवा कसे, याचा निर्णय घेण्याचे अधिकार हे संबंधित विभागांचे सहाय्यक आयुक्तांना असतील, असेही महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिका हद्दीमध्‍ये बाजार विभागाच्‍या अखत्‍यारित 92 किरकोळ मंडया, 16 खासगी मंडया व 95 मंडया समायोजन आरक्षण अंतर्गत प्राप्‍त झाल्‍या आहेत. देशभरात कोविड 19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 23 मार्च 2020 पासून टाळेबंदी लागू करण्यात आली. तेव्‍हापासून बृहन्‍मुंबईतील बाजार विभागाच्‍या अखत्‍यारितील मंडयांमधील अत्‍यावश्‍यक / जीवनावश्यक वस्तू, सेवा देणाऱया दुकानांव्‍यतिरिक्‍त इतर दुकाने बंद करण्‍यात आली होती. त्‍यानंतर मुंबईमध्‍ये दिनांक 2 जून 2020 पासून रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूस असलेली दुकाने सम व विषम तारखेस खुली करण्‍यासाठी निर्देश देण्‍यात आले आहेत. या आदेशाच्‍या अनुषंगाने विविध मंडयांतील व्‍यापारी संघटना व त्‍यांच्‍या प्रतिनिधींनी मंडयांतील इतर दुकाने सुरु करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला लेखी विनंती केली. कोविड 19 संसर्ग वाढू नये यासाठी शासनाच्‍या अटी व शर्तींचे पालन करुन मंडईतील दुकाने सुरु करण्‍यास या संघटनांनी सहमती दर्शवली आहे. मास्क-हॅण्ड ग्लोव्हज्‌, सॅनिटायझर यांची व्यवस्था करणे, प्रत्येक व्यक्तिचे शारीरिक तापमान तपासणे, सुरक्षित अंतर राखणे या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासह आवश्यकता भासल्यास मंडईमध्ये गर्दी नियंत्रणात करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात खासगी सुरक्षा रक्षक नेमणे आदी उपाययोजना करुन प्रशासनाला सहकार्य करण्यात येईल, असे या विविध संघटनांनी मान्य केले आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनानेही सकारात्मक पाऊल उचलून मंडया सुरु करण्यास परवानगी दिली आहे. महानगरपालिकेच्‍या मंडयामधील काही दुकानांची रचना ही तळमजल्‍यावरील संकुलात्‍मक स्‍वरुपाची असून काही दुकाने समोरासमोर, तर बहुतांश मंडईत 30 ते 40 बंदीस्‍त दुकाने एकमेकांना लागून आहेत. मंडईमधील जीवनावश्‍यक वस्‍तुंची (Essential) विक्री करण्‍याकरीता यापूर्वी नियमानुसार परवानगी होती. आता जीवनावश्‍यक वस्‍तुंव्‍यतिरिक्‍त इतर वस्‍तुंची विक्री (Non-Essential) करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ज्याप्रमाणे रस्‍त्‍यांवरील दोन्ही बाजुंची दुकाने आळीपाळीने सुरु करण्यात आली आहेत, त्याच धर्तीवर महापालिकेच्‍या मंडईतील दोन्ही बाजूस असलेली दुकाने सम-विषम तारखेस आळीपाळीने सुरु राहतील. तसेच एका रांगेत असलेल्या मंडईत आळीपाळीने दुकाने सुरु ठेवण्यात येतील. दुकाने सुरू करताना कोणत्या अटी असतील? मंडया सुरु करताना, दुकानांसंबंधी शासनाने आणि महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे सर्वांना बंधनकारक राहणार आहे. मंडईमधील सर्व दुकाने रविवारी बंद राहतील. तसेच मंडयांमध्ये किरकोळ स्वरुपातीलच व्यवसाय करता येईल, घाऊक व्यवसाय करता येणार नाही. मंडई व परिसरामध्ये थुंकण्यास व अस्वच्छता करण्यास मनाई असून तसे करताना आढळलेल्या दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाईल. मंडईमध्ये दुकानदारांनी वस्तुंची अदलाबदल अथवा वस्तू परत घेण्याचे धोरण ठेवू नये. मंडईमध्ये उपहारगृह (हॉटेल/कॅन्टीन) इत्यादी बंद राहतील. दुकानांमध्ये काम करण्यासाठी फक्त 2 व्यक्ती असतील. तसेच कामे करण्यासाठी दुकानांमध्ये ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्ती यांना नेमता येणार नाही. कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापाऱयांनी प्रवेशद्वारावर नियमावली प्रदर्शित करणे आवश्यक असेल. प्रत्येक दुकानदार/व्यापारी यांना आपापल्या भ्रमणध्वनीमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे आवश्यक असेल. मंडईतील कोणत्याही दुकानावर सुरक्षित अंतर राखण्याचे नियमांचे पालन होत नाही, असे आढळल्यास सदर दुकान तत्काळ बंद करण्यात येईल व संबंधित अनुज्ञापत्र धारकांवर नियमानुसार कारवाईदेखील करण्यात येईल. मंडया सुरु करण्यास परवानगी देण्यात येत असली तरी, सद्यस्थिती लक्षात घेता, महानगरपालिकेच्या 24 विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये काही क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. अशा प्रतिबंधित क्षेत्रातील मंडयांबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार हे संबंधित विभागांच्या सहाय्यक आयुक्तांकडे सोपविण्यात आले आहेत. आतापर्यंत मंडयांमध्ये जीवनावश्यक वस्तुंचे व्यवहार सुरु ठेवताना कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची पुरेपूर काळजी प्रशासनाने घेतली असून मंडयांमधून लागण वाढल्याची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. अशाच प्रकारचे सहकार्य यापुढेही सर्व व्यापारी, विक्रेते, व्यापारी संघटना, ग्राहक व सर्व संबंधितांकडून अपेक्षित आहे. मंडयांमधील व्यवहार सुरळीत होण्यासाठी योग्य सूचना प्राप्त झाल्यास त्यांचाही वेळोवेळी विचार करुन निर्णय घेण्यात येईल, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. संपादन - अक्षय शितोळे

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    First published:

    Tags: Lockdown, Mumbai news

    पुढील बातम्या