धारावीनंतर मुंबईतून कोरोनाबाबत आता आणखी एक आनंदाची बातमी

धारावीनंतर मुंबईतून कोरोनाबाबत आता आणखी एक आनंदाची बातमी

मुंबई परिसरातून आणखी एक आनंदाची बातमी आली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या मुंबईतील धारावी (Dharavi) परिसरात सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला. कोरोनासारख्या (Coronavirus) आजाराचा संसर्ग झोपडपट्टी भागात नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो, असा धोका वर्तवण्यात येत होता. मात्र प्रशासनावर युद्धपातळीने केलेल्या उपाययोजनांमुळे धारावीत कोरोनाला रोखण्यात यश आलं. या कामगिरीचं कौतुक जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं. त्यानंतर आता मुंबई परिसरातून आणखी एक आनंदाची बातमी आली आहे.

कोविड 19 संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून लक्ष्य निर्धारित करुन होत असलेल्या उपाययोजना योग्य दिशेने होत आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसांवर नेण्याचे उद्दिष्ट गाठल्याने ते सिद्ध झाले आहे. यासोबत महत्त्वाची बाब म्हणजे उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही आता 70 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, अशी दिलासादायक माहिती समोर आली आहे.

कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक उपाययोजना करताना योग्य नियोजन, अंमलबजावणीची निश्चित दिशा आणि सातत्याने पाठपुरावा करुन प्रत्येक कार्यवाही केली जात आहे. महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार प्रत्येक धोरण आखताना त्यामध्ये लक्ष्य निर्धारित कामगिरी करण्यावर प्रशासनाकडून सांघिक भर दिला जात आहे. सर्वात आधी प्रतिबंधित क्षेत्रांचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. त्यानंतर विषाणूचा पाठलाग (चेस द व्हायरस) या धोरणातून बाधित, संशयित रुग्णांचा व्यापक मोहीमेतून शोध घेणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तिंचे अधिकाधिक संस्थात्मक अलगीकरण करणे, घरोघरी जाऊन व फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून तसेच विशेष शिबिरांतून जास्तीत जास्त चाचण्या करीत रुग्ण वेळीच शोधणे व त्यांच्यावर उपचार करणे, रुग्णालयांसह ठिकठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये पुरेशा व गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा निर्माण करणे, परिणामकारक अशा औषधी साठा उपलब्ध करुन त्या आधारे उपचारांवर भर देणे अशा एक ना अनेक चौफेर उपाययोजनांनी कोविड 19 संसर्ग नियंत्रणात आणायला मदत होते आहे. या सर्व उपाययोजना योग्य पद्धतीने आखून त्याची अंमलबजावणी देखील होत असल्याचे आता वस्तुस्थितीदर्शक आकडेच बोलू लागले आहेत.

कशी सुधारली स्थिती?

महानगरपालिका प्रशासनाने दिनांक 22 जून 2020 रोजी मिशन झिरो या शीघ्र कृती अभियानाचा प्रारंभ केला होता. त्यावेळी मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 37 दिवस होता. हा कालावधी 2 ते 3 आठवड्यांत 50 दिवसांवर नेण्याचे लक्ष्य असल्याचे महापालिका आयुक्त चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना घोषित केले होते. तसेच त्यादृष्टीने प्रशासनाने निश्चित केलेल्या आराखड्याची माहितीदेखील दिली होती. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 1 जुलै 2020 रोजी 42 दिवसांवर पोहोचला. तर आज (दिनांक 13 जुलै 2020) हा कालावधी 51 दिवसांचा आहे.

मुंबईत दररोज कोविड रुग्ण वाढीचा सरासरी दर 1जुलै 2020 रोजी 1.68 टक्के होता. हा दर काल (दिनांक 12 जुलै 2020) 1.36 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. याचाच अर्थ रुग्ण वाढ मंदावत असून प्रशासन आपले घोषित लक्ष्य गाठण्यात यशस्वी होताना दिसत आहे.

एका बाजूला रुग्ण संख्या नियंत्रणात आणणे, त्यांना वेळीच शोधणे यावर जोर दिला जात असताना दुसऱया बाजूला प्रत्यक्ष रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. दिनांक 22 जून 2020 रोजी मुंबईत उपचार घेऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे सुमारे 50 टक्के होते. दिनांक 1 जुलै 2020 रोजी हे प्रमाण 57 टक्के झाले. तर दिनांक 12 जुलै 2020 रोजी हा दर 70 टक्के झाला आहे.

आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत असताना, प्रत्यक्ष उपचार घेणाऱया रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने रुग्णालयांमध्ये कोविड 19 बाधितांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णशय्या (बेड) रिकाम्या असण्याचे प्रमाणही वाढले आहे. सद्यस्थितीत विविध समर्पित कोरोना रुग्णालये व कोरोना आरोग्य केंद्र मिळून 22 हजार 756 रुग्णशय्या उपलब्ध आहेत. यापैकी 10 हजार 130 बेड रिकामे आहेत. साहजिकच रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याची तक्रार आता निकालात निघाल्या सारखीच आहे. महानगरपालिका प्रशासनाने ठिकठिकाणी उभारलेली कोरोना काळजी केंद्र व कोरोना आरोग्य केंद्र यामुळे उपचार सुविधांचे विकेंद्रीकरण झाले. तसेच विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) च्या माध्यमातून रुग्णशय्यांचे व्यवस्थापन होऊ लागल्याने त्यामध्ये सुसूत्रता आली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 13, 2020, 4:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading