मुंबईत कोरोनाबद्दल 6 नवे निर्णय, कंटेंड इमारतीमध्‍ये प्रवेश करण्याबाबत कठोर निर्बंध

मुंबईत कोरोनाबद्दल 6 नवे निर्णय, कंटेंड इमारतीमध्‍ये प्रवेश करण्याबाबत कठोर निर्बंध

कोरोनाला रोखण्यासाठी पुढचे काही दिवस चांगली खबरदारी घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोनाबाबत काही नवे निर्णय घेण्यात आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 30 सप्टेंबर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाबत दिलासादायक आकडे येऊ लागले आहेत. पुण्यासह अनेक शहरांमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं चित्र आहे. मात्र असं असलं तरीही कोरोनाला रोखण्यासाठी पुढचे काही दिवस चांगली खबरदारी घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोनाबाबत काही नवे निर्णय घेण्यात आले आहेत.

काय आहेत नवे निर्णय?

1.सिल इमारती / कंटेंड इमारतीमध्‍ये प्रवेश करणे व बाहेर जाणे यावर अधिक कठोर निर्बंध : ज्‍या इमारतींमध्‍ये कोणत्‍याही दोन मजल्‍यावर कोविड बाधित रुग्‍ण आढळून आले किंवा संपूर्ण इमारतीमध्‍ये 10किंवा अधिक रुग्‍ण आहेत, अशा इमारती सील करण्‍याचे आदेश यापूर्वीच देण्‍यात आले होते. या इमारतींमध्‍ये आता अधिक प्रभावीपणे कोविड प्रतिबंधात्‍मक उपाययोजना राबविण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. यामध्‍ये प्रामुख्‍याने इमारतीत प्रवेश करणे व इमारतीतून बाहेर जाणे, यावर अधिक कठोर निर्बंध लागू करण्‍याचे निर्देश. त्‍याचबरोबर इमारतीमध्‍ये कार्यरत असणारे सुरक्षा रक्षक, लिफ्टमन, सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी यांची कोविड विषयक वैद्यकिय चाचणी करण्‍याच्‍या सूचना.

2. माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणाची प्रभावी अंमलबजावणी : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत करण्‍यात येत असलेले सर्वेक्षण योग्‍य प्रकारे होत असल्‍याची खातरजमा करणे, यासाठी परिमंडळीय उपायुक्‍तांच्‍या स्‍तरावरुन काही व्‍यक्‍तींची नेमणूक करुन त्‍यांच्‍याद्वारे नमूना पध्‍दतीने सर्वेक्षणाची चाचणी करण्‍याचे निर्देश.

3. खाटा उपलब्‍धतेच्‍या डॅशबोर्डवर वेळेत माहिती अपडेट न केल्‍यास रुग्‍णालयावर कारवाई : बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुगणालयांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या खाटांचे व्‍यवस्‍थापन अधिक प्रभावीप्रणे साध्‍य व्‍हावे, यासाठी महापालिकेने संगणकीय डॅशबोर्ड यापूर्वीच कार्यान्वित केले आहेत. या डॅशबोर्डवर संबंधित रुग्‍णालयांनी आपापल्‍या रुग्‍णालयातील माहिती नियमितपणे ‘अपडेट’ करणे गरजेचे आहे. मात्र काही रुग्‍णांलयाद्वारे ही माहिती वेळेत अपडेट केली जात नसल्‍यामुळे खाटांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यात अडचणी येऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन वेळेत माहिती अपडेट न करणा-या रुग्‍णालयांना संबंधित नियमांनुसार नोटीस बजवण्‍याचे निर्देश.

4. वैद्यकीय चाचण्‍या व्‍यापकतेने करण्‍याचे निर्देश : बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड विषयक वैद्यकीय चाचण्‍यांची संख्‍या वाढविण्‍याचे गरज लक्षात घेऊन सर्व विभागस्‍तरीय सहाय्यक आयुक्‍तांनी आपापल्‍या विभागातील दैनंदिन चाचण्‍यांची संख्‍या नियोजनपूर्वक वाढविण्‍याचे निर्देश.

5. बिना ‘मास्क’ विषयक दंडात्‍मक कारवाई लक्ष्‍य आधारित पद्धतीने : बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या सर्व 24 विभागांच्‍या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक परिसरांमध्‍ये बिना ‘मास्क’ वावरणा-या नागरिकांवर प्रत्‍येक वेळी, प्रत्‍येक ठिकाणी रुपये 200 याप्रमाणे दंडात्‍मक कारवाई करण्‍याचे निर्देश यापूर्वीच देण्‍यात आले आहेत. ही कारवाई अधिक प्रभावीपणे करण्‍यासह व्‍यापकतेने करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले.

6. एसटी महामंडळाकडून 1 हजार बसेस भाडेतत्‍वावर : महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाकडून (एस.टी महामंडळ) 1 हजार बसेस बेस्‍ट मार्गांवर चालविण्‍यासाठी भाडेत्‍त्‍वावर घेण्‍यात येत आहेत. याबाबतची माहिती बेस्‍ट चे महाव्‍यवस्‍थापक श्री. सुरेंद्रकुमार बागडे यांनी बैठकीदरम्‍यान दिली. या अनुषंगाने अधिक नियोजनपूर्वक बसेसचे व्‍यवस्‍थापन करावे असे निर्देश महापालिका आयुक्‍तांनी आजच्‍या बैठकीदरम्‍यान दिले.

Published by: Akshay Shitole
First published: September 30, 2020, 8:45 PM IST

ताज्या बातम्या