मुंबईमध्ये धडकला कोरोना व्हायरस? 3 संशयित रुग्ण आढळले

मुंबईमध्ये धडकला कोरोना व्हायरस? 3 संशयित रुग्ण आढळले

रोगाचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

  • Share this:

मुंबई, 4 मार्च : केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशभरात 28 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 300 जण हे संशयित रुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबईत आज तीन संशयित रुग्ण दाखल केल्याची माहिती दिली आहे. मुख्य म्हणजे या रोगाचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

पालिकेच्या म्हणण्याप्रमाणे सध्या महापालिका रुग्णालयात म्हणजेच कस्तुरबा गांधी रुग्णालयात 28 बेड हे विलगीकरणाचे म्हणजेच आईसोलेशन तयार ठेवण्यात आले आहे. सोबतच पालिकेनं स्वतःची पीएससी लॅब तयार केली आहे. ज्यात या संशयित रुग्णांचे नमुने तपासले जाऊ शकतात. ते आता पुण्याला पाठवण्याची गरज नाही.

एकाच दिवशी पालिका 90 जणांचे नमुने तपासू शकते. प्रत्येक नमुना तपासायला तीन तासाचा कालावधी लागतो. तर त्याचा अहवाल यायला दोन तासाचा कालावधी लागतो. असे एकूण पाच तासात हे नमुने तपासले जाऊ शकतात. पालिकेने कस्तुरबा गांधी रुग्णालय याव्यतिरिक्त इतर चार महापालिका रुग्णालयालाही सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा- 'कोरोना'च्या दहशतीमुळे बोर्डाने 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांबाबत घेतला मोठा निर्णय

मुंबईत या व्हायरसचा प्रभाव वाढला तर महापालिका रुग्णालय, राज्य सरकारची रुग्णालय त्याचबरोबर खाजगी रुग्णालय 500 बेड व्यवस्था महापालिका करू शकेल, असा दावा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी केला आहे. सोबतच औषधे आणि N 95 मास्टर यांचीही पुरेशी उपलब्धता असल्याची माहिती दिली आहे.

'नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी. सर्दी, ताप, खोकला असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. शंका आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन कस्तुरबा गांधी रुग्णालयात आपल्या नमुन्याची चाचणी करून घ्यावी,' अशी माहिती पालिकेनं दिली आहे.

कस्तुरबा गांधी रुग्णालयात खास ओपीडी सुरू करण्यात आली आहे. सध्या परदेशातून प्रवास करणाऱ्या नागरिकांवर एकच लक्ष केंद्रीत करत असल्याचं अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितलं आहे. देशांतर्गत भागात या रोगाचा प्रसार अजून झालेला नाही. त्यामुळे रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची तपासणी करण्याकडे तूर्तास आमच्या विचारात नसल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

First published: March 4, 2020, 11:08 PM IST

ताज्या बातम्या