विरार, 14 ऑगस्ट : देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. यामध्ये डॉक्टर आरोग्य सेवा आणि पोलीस अहोरात्र काम करत आहेत. यांच्यासोबतच आणखीन एक महत्त्वाची भूमिका निभावत असणारे कोरोना वॉरियर्स म्हणजे अंत्यसंस्कार करणारे वॉलेंटियर्स. आपला जीव धोक्यात घालून ते कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत असतात. अशाच एका कोरोना वॉरियरचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समीती ईचे कर्मचारी असलेल्या रवींद्र जगताप यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्याकडे कोविड-19 रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम होतं. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडी. त्यानंतर कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. गुरुवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
हे वाचा -व्हायरसचे रुप बदललं! सोशल डिस्टन्सिंगच्या नियमात बदल करण्याचा सल्ला
रवींद्र जगताप यांच्या जाण्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तर जगताप कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर 15 दिवसांपासून सिद्धीविनायक रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू होते.
देशात काय आहे कोरोनाची स्थिती
गेल्या 24 तासांतही 66 हजार 552 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 1007 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 24 लाख पार झाला आहे. देशात सध्या आता 24 लाख 61 हजार 190 रुग्ण आहेत.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातल कोरोनाचे 6 लाख 61 हजार 595 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 48 हजार 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकमेव दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 17 लाख 51 हजार 555 रुग्ण निरोगी झाले आहेत.