मुंबई, 28 जून : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशात कृष्णकुंजवर कोरोना पोहोचल्यानंतर आता सेनाभवनालाही कोरोनाचा विळखा बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना भवनातील आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. कार्यालयात काम पाहणाऱ्यांना कोरोना झाला होता. त्यामुळे कोरोना रुग्ण आढळल्यानं सेनाभवनात फवारणीकरून ते सील करण्यात आलं होतं. मात्र, तरीही सेना भवनाभोवती कोरोनाचा विळखा वाढत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 19 जूनला सेनाभवनात गेले होते. तिथे कोरोना झालेले तीनहीजण उपस्थित होते. इतकंच नाही तर त्यावेळी दिवाकर रावते, संजय राऊत, किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत हेही उपस्थित होते. त्यामुळे या सर्वांची कोरोना चाचणी करावी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हे वाचा-'काळं सोनं' लुटले पण पळून जाताना व्हॅन कोसळली कॅनॉलच्या खड्यात, तिघे जागीच ठार
दरम्यान, राज ठाकरेंच्या कृष्णकुंजपर्यंतही कोरोना पोहोचला आहे. राज ठाकरेंच्या घरी घरकाम करण्याऱ्या 2 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाची लक्षणं आढळल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर याआधीही राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, सुदैवाने आता हे सुरक्षारक्षक कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, फक्त राज ठाकरेच नाही तर अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. धनंजय मुंडे यांचे दोन स्वीय सहाय्यक आणि गाडी चालकाला देखील कोरोना झाला होता. विशेष म्हणजे राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी झाले होते. या अगोदर मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचं उदघाटन देखील केलं होतं. पण आता धनंजय मुंडे हे ठीक असून त्यांनी कोरोनावर मात करून घरी परतल्याची माहिती देण्यात आली आहे.
संपादन - रेणुका धायबर