काँग्रेसच्या प्रवक्त्याने केलं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट, कोरोनावरून गंभीर टीका

काँग्रेसच्या प्रवक्त्याने केलं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट, कोरोनावरून गंभीर टीका

'युद्धज्वर निर्माण करणारी व अस्मितेला विनाकारण फुंकर घालणारी भाषणे करणे म्हणजे प्रत्यक्ष उद्दिष्ट साध्य करण्यातील अपयश लपविण्याचा प्रयत्न आहे.'

  • Share this:

मुंबई 09 मे: कोरोनाचं प्रकरण सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातत्याने राज्यातल्या जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांचं भाषण हे शांत, संयमी आणि सगळ्यांना घेऊन जाणारं असल्याचं कौतुक अनेकांनी केलंय. जावेद अख्तर सारख्या जाणत्या गीतकारानेही त्याचं कौतुक केलं आहे. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी मात्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केलीय. अशी युद्धज्वर निर्माण करणारी व अस्मितेला विनाकारण फुंकर घालणारी भाषणे पुन्हा पुन्हा करणे म्हणजे प्रत्यक्ष उद्दिष्ट साध्य करण्यातील आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करणे आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका करत गंभीर आरोप केलाय. ते म्हणाले, ही लढाई नव्हती, नाही! करोना हा एक आजार आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त वैद्यकीय उपचार व वैज्ञानिक विचार - दृष्टीची व व्यवहार्य उपायांची गरज आहे.

त्याऐवजी महाभारतकी लडाई, शिवरायांचा महाराष्ट्र, लढवय्या महाराष्ट्र, या लढाईत लढणारे शूर सैनिक.... अशी युद्धज्वर निर्माण करणारी व अस्मितेला विनाकारण फुंकर घालणारी भाषणे पुन्हा पुन्हा करणे म्हणजे प्रत्यक्ष उद्दिष्ट साध्य करण्यातील आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करणे आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कायम आपल्या भाषणात अशा प्रकारचे उल्लेख करत असतात. मात्र सध्याचं वातावावरण पाहाता काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारची टीका करणं हे आश्चर्यकारक मानलं जातं.

First published: May 9, 2020, 10:58 PM IST

ताज्या बातम्या