मुंबई, 28 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार आणि शिवसेना दोन्ही धोक्यात आलं आहे. परिणामी आता सत्तांतर होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे राहिलेल्या वेळेत ठाकरे सरकार लोकप्रिय निर्णय घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. याआधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (New Mumbai International Airport) दि. बा. पाटील यांचं नाव देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. आता अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेला विषय मार्गी लावण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर ठेवण्याचा प्रस्ताव आज राज्य मंत्री मंडळात मांडणार असल्याची माहिती परीवहन मंत्री अनिल परीब यांनी दिली आहे. मात्र, याला काँग्रेसचा विरोध असल्याची सुत्रांची माहिती आहे.
एकीकडे महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या (Maharashtra political crisis) पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची फ्लोअर टेस्ट (what is floor test) घेण्यास सांगितले आहे. दुसरीकडे आता महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या एका प्रस्तावामुळे काँग्रेस नाराज झाल्याची माहिती आहे. विश्वासदर्शक प्रस्तावाआधी आघाडी सरकारमध्ये दोन गट पडण्याची शक्यता आहे.
आता काय करायचं? पवारांच्या बैठकीला दांडी मारल्यानंतर ‘मातोश्री’वर खलबतं!
औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध
औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव आहे. मात्र, याला आघाडीतील मित्र काँग्रेसचा विरोध असल्याची माहिती आहे. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्हर ओकवर झालेल्या बैठकीत काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही काँग्रेस विरोध करणार असल्याची माहिती आहे. परिणामी औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दा आज वादळी ठरणार असल्याची चिन्हे आहे.
संभाजीनगर नावाचा इतिहास?
1988 मध्ये औरंगाबादच्या सभेत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा हा औरंगाबादचे नाव संभाजीनगर नारा दिला होता. तेव्हापासून औरंगाबादेत शिवसेनेकडून औरंगाबादचे संभाजीनगर असा शहराचा उल्लेल केला जातो. 9 नोव्हेबर 1995 या वर्षात राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे नामकरण करण्यासाठी असा प्रस्ताव औरंगाबाद महापालिकेने पाठवला. मात्र 2001 ला काँग्रेस आघाडी सरकाने रद्द ठरवला. आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत असताना संभाजीनगरचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यावर आता निर्णय होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.