मुंबई 07 जानेवारी : मोठ्या कष्टाने तयार झालेल्या ठाकरे सरकारला पहिल्या दिवसांपासूनच नाराजीचं ग्रहण लागलंय. हे ग्रहण काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीये. आज राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या पहिल्याच बैठकीत काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दांडी मारलीय. खाते वाटपात कमी महत्त्वाचं खातं मिळाल्यामुळे वडेट्टीवार नाराज असल्याची चर्चा आहे. ही नाराजी व्यक्त करण्यासाठीच ते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहिले नाहीत असं बोललं जातंय. या आधी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही राजीनामा दिल्याचं सांगितलं जात होतं. मात्र नंतर त्यांचं मन वळविण्यात आलं होतं. तीन पक्षांचं सरकार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजांचं मन वळविण्यासाठी जास्त शक्ती खर्चा करावी लागेल अशी शक्यता व्यक्त केलीय जातेय.
खातेवाटपात विजय वडेट्टीवारांना इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन ही खाती मिळाली होती. विरोधी पक्ष नेते राहिलेले वडेट्टीवार हे काँग्रेसचे विदर्भातले महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे आपल्याला चांगलं खातं मिळावं अशी त्यांची इच्छा होती. सगळ्याच पक्षांमधल्या नेत्यांनी चांगल्या खात्यांसाठी दबाव टाकल्याने खातेवाटप रखडलं होतं.
देवेंद्र फडणवीसांचा जयंत पाटलांवर पलटवार, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये 'सोशल वॉर'
मंत्र्यांच्या डिग्रीचा वाद
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन काही दिवस जात नाहीत तोवरच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे अडचणीत सापडले आहेत. कारण सामंत यांच्या डिग्रीबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. उदय सामंत यांनी ज्या विद्यापीठातून इंजिनिअरींगची डिग्री घेतली होती, त्या विद्यापीठाला सरकारची मान्यता नसल्याचा आरोप करत पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभिषेक हरदास यांनी सावंत यांची डिग्री बोगस असल्याचं म्हटलं आहे.
ज्ञानेश्वर विद्यापीठातून ऑटोमोबाइल इंजिनअरींगचा डिप्लोमा केला असल्याचं उदय सामंत यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. मात्र या ज्ञानेश्वर विद्यापीठाला शासनाची मान्यता नसल्याचा आरोप याआधीही करण्यात आला होता. त्यामुळे उदय सामंत वादात सापडले आहेत.
वादावर काय म्हणाले उदय सामंत?
बोगस डिग्रीचा आरोप झाल्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 'वैयक्तिक ज्ञानात भर टाकण्यासाठीच मी ही डिग्री घेतली होती. मात्र मी त्या डिग्रीद्वारे आजपर्यंत कोणताही सरकारी लाभ अथवा नोकरी मिळवलेली नाही,' असं सामंत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Vijay wadettiwar