Home /News /mumbai /

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत नाराजीनाट्य, बैठकीत सहभागी न होताच ऊर्जामंत्री नितीन राऊत माघारी परतले

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत नाराजीनाट्य, बैठकीत सहभागी न होताच ऊर्जामंत्री नितीन राऊत माघारी परतले

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीत काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांना आमंत्रणच मिळाले नसल्याने नाराज झाल्याचं बोललं जात आहे.

    विनोद राठोड, प्रतिनिधी मुंबई, 27 जानेवारी : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत (Congress leaders meeting) नाराजीनाट्य पहायला मिळत आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक मुंबईत (Maharashtra Congress leaders meeting) सुरू आहे. या बैठकीत काँग्रेसमधील अंतर्गत कुरबुरी समोर येताना दिसून येत आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे बैठकीसाठी दाखल झाले खरे मात्र, बैठकीचे निमंत्रण नसल्यानेच ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) हे माघारी परतले. काँग्रेस पक्षाची वांद्रे येथील एमसीएत महत्त्वाची बैठक सुरू आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. या बैठकीत काँग्रेसचे ठराविक आणि मोजकेच नेते उपस्थित आहेत. बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले,बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सहित अनेक नेते उपस्थित आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन राऊत यांना या बैठकीच्या संदर्भात कळवण्यात आले नव्हते आणि त्यामुळे त्यांनी एमसीएच्या दरवाजा समोरून माघारी परतण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. आधीच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या येत असताना आता काँग्रेस पक्षात सुद्धा नाराजीनाट्य सुरू झाल्याचं दिसून येत आहे. वाचा : काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीची नाराजी, महाविकास आघाडीत बिघाडी? मविआमध्ये सुद्धा काँग्रेस नाराज महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नेत्यांना आणि मंत्र्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप अनेकदा काँग्रेस मंत्र्यांकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकार काळात काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याचं विधान केलं आहे. तसेच आपण काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आक्रमक होऊ, असाही इशारा त्यांनी दिलाय. अमित देशमुख हे नुकतेच औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे याआधी काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. आता हीच धूसफूस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पोहोचल्याची चर्चा आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Congress, Mumbai, Nitin raut

    पुढील बातम्या