मिलिंद देवरांचं राजकारण वडिलांच्या जीवावर, काँग्रेसच्या महिला नेत्याचा गंभीर आरोप

मिलिंद देवरांचं राजकारण वडिलांच्या जीवावर, काँग्रेसच्या महिला नेत्याचा गंभीर आरोप

तुम्ही वडिलांच्या नावावर पक्षात आलात. नंतर आयतच तिकीट मिळालं, काँग्रेसच्या लाटेत निवडून आलात आणि पहिल्याच वेळी मंत्री झालात.

  • Share this:

नवी दिल्ली 17 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये सुरु झालेली भांडणं अजुन थांबलेली नाहीत. आता दिल्लीत सपाटून मार खाल्ल्यानंतर पुन्हा काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये सोशल मीडियावर भांडण सुरु झालंय. माजी खासदार आणि राहुल गांधींच्या विश्वासातले समजल्या जाणाऱ्या मिलिंद देवरांनी अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडीओ ट्वीट करत त्यांची स्तुती केली. त्यावर दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांनी देवरांना चांगलंच सुनावलंय. केजरीवालांची स्तुती करायची असेल तर पहिल्यांदा काँग्रेस सोडा असा खोचक सल्लाही त्यांनी देवरांना दिलाय. तर पक्षाच्या महिला नेत्या अलका लांबा यांनीही देवरांवर नाव न घेता जोरदार टीका केलीय.

देवरांनी केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत दिलेल्या भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केला होता. केजरीवालांनी टॅक्स न वाढवता दिल्ली सरकारचं उत्पन्न 30 हजार कोटींवर नेलं. सरकार तोट्यातून नफ्यात आणलं. हा चांगला उपक्रम आहे अशी स्तुती त्यांनी केली होती.

देवरांनी केजरीवालांची तारीफ करणं हे दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांना आवडलं नाही. माकन यांनी देवरांना सुनावत सांगितलं की, अर्धवट माहिती देत केजरीवालांचा प्रचार करू नका तसं करायचं असेल तर आधी काँग्रेस सोडा. नेमकं काय झालं त्याची मी तुम्हाला माहिती देतो असं सांगत त्यांनी काही आकडेवारी देत काँग्रेसच्या काळात दिल्लीत कसं उत्पन्न वाढलं हे दाखवून दिलंय.

तर अलका लांबा यांनीही जोरदार हल्लाबोल केलाय. तुम्ही वडिलांच्या नावावर पक्षात आलात. नंतर आयतच तिकीट मिळालं, काँग्रेसच्या लाटेत निवडून आलात आणि पहिल्याच वेळी मंत्री झालात. जेव्हा स्वत:च्या बळावर निवडून यायची वेळ आली तेव्हा पराभव झाला. आत पक्षाला शिव्या देत दुसऱ्यांची स्तुती करत गिटार वाजवा असं त्यांनी म्हटलं आहे.

मिलिंद देवरा हे काँग्रेसच्या कार्यसंस्कृतीवरून नाराज असल्याचं बोललं जातंय. या आधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही कौतुक केलं होतं. त्याला मोदींनीही उत्तर दिलं होतं. त्यामुळे देवरांच्या मनात नेमकं चाललं तरी काय? असा प्रश्नही विचारला जाऊ लागला. आता हे नवं भांडण सोशल मीडियावर सुरु झाल्याने पुन्हा एकदा काँग्रेसमधल्या मतभेदांची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा...

उद्धव ठाकरेंवरील नाराजीनंतर शरद पवारांनी मुंबईत बोलावली महत्त्वाची बैठक

VIDEO ''हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय'', ऐकणाऱ्यालाच बसला शॉक

First published: February 17, 2020, 10:52 AM IST

ताज्या बातम्या