09 मार्च : ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचं निधन झालं. लीलावती हाॅस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 72 वर्षांचे होते.
पतंगराव कदम.. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातलं मोठं नाव. महसूल, सहकार, वन, मदत आणि पुनर्वसन.. अशी महत्वाची खाती ज्यांनी हाताळली.. 1967 साली भारती विद्यापीठाची त्यांनी नुसती स्थापनाच केली नाही पण या रोपाचं वटवृक्ष करून दाखवलं. देश-विदेशात मिळून या विद्यापीठाची 180 महाविद्यालयं आणि संस्था आहेत. इतकं मोठं कार्य करणाऱ्या या नेत्याची सुरुवात मात्र तशी खडतरंच झाली..
सांगली जिल्ह्यातील सोनसळ या खेड्यातील शेतकऱ्याचा हा मुलगा. गावात चौथीपर्यंतच शाळा, पुढे कुंडलला माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुणे गाठले. द्विपदवीधर झाले. शिक्षक झाले. पण काहीतरी मोठं आणि वेगऴं करायचं हे त्यांनी मनात पक्क केलं होतं. ते राजकारणात आले.. 1968 साली एसटी महामंडळाचे सदस्य बनले आणि राजकीय प्रवास सुरू झाला.. 1980 साली काँग्रेसचं तिकीट मिळावं यासाठी हा तरुण कार्यकर्ता खूप धडपड करत होता.. शेवटी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. 1980च्या दशकात महाराष्ट्रातली काँग्रेस म्हणजे वसंतदादा पाटलांची काँग्रेस.. त्या वातावरणात अपक्ष म्हणून उभं राहणं म्हणजे किती धाडसाचं ! आणि पराभवही काही शे मतांनी झाला. पण हार मानतील ते पतंगराव कसले.. 1985 साली त्यांनी अधिक मेहनत केली आणि वयाच्या 41व्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले.
त्यानंतर 1995 सालता अपवाद वगळला तर सलग 6 वेळा ते विधानसभेवर निवडून गेले. मंत्री झाले.. महसूल आणि सहकारसारखी महत्वाची खाती सांभाळली. पुण्यातल्या हिंजेवाडीत आज मोठ्या दिमाखात उभं असलेलं आयटी पार्क पतंगरावांच्या दूरदृष्टीचं साक्षीदार आहे. हे करतानाच नावामागे डॉक्टर लागलं, कुलपतीपद आलं.. अपयश जणू त्यांचा शत्रूच. पण राजकारणात मात्र हा माणूस अजातशत्रूच. यशवंतराव चव्हाणांचे राजकीय संसार झाल्यामुळे विरोधकांना कधी शत्रू मानलं नाही. मतभेद होते, विचारसरणी वेगळी होती.. पण सेना-भाजपच्या नेत्यांबाबत मनात कटूता नाही. भेटले की प्रेमानं बोलणार.. चेष्टा करणार.. पतंगरावांचा हा गुण सर्वांनाच आवडायचा. परिस्थिती कितीही खडतर असो, चेहऱ्यावरचं हास्य कधी गेलं नाही. पण आपल्या जाण्यानं मात्र हा मनमिळाऊ नेता सर्वांच्याच मनाला चटका लावून गेला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Patangrao kadam