मुंबई, 10 जुलै : मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, संजय निरुपम यांच्यासह कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डि. के. शिवकुमार यांना मुंबईतील रेनेसान्स हॉटेलच्या बाहेरून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कर्नाटकातील 10 बंडखोर वास्तव्यास असलेल्या या हॉटेलबाहेर जमावबंदी आहे. असं असतानाही काँग्रेस नेते हॉटेलबाहेर थांबल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
कर्नाटकमधील 10 बंडखोर आमदार सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. या आमदारांची समजूत काढण्यासाठी कर्नाटकमधील काँग्रेसचे दिग्गज नेते अशी ओळख असलेले डी.के. शिवकुमार हेदेखील आता मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र ज्या आमदारांना भेटण्यासाठी शिवकुमार आले त्याच आमदारांनी शिवकुमार यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे.
'काँग्रेस नेते डे.के शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे,' असं पत्र कर्नाटकच्या 10 बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांना लिहीलं आहे. आमदारांच्या या आरोपामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
'शिवकुमार आणि कुमारस्वामींना भेटण्याची इच्छा नाही' असंही बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. सध्या सगळे 10 आमदारा रेनेसान्स हॉटेलमध्ये असून कडक सुरक्षेत त्यांना ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आमदारांची समजूत काढण्यासाठी आलेल्या डीके शिवकुमार यांना पोलिसांनी हॉटेलबाहेरच रोखलं होतं.
मला माझ्या रूम मध्ये जाऊ दिलं जात नाही. मला हॉटेलमध्ये विश्रांती घेऊन कॉफी प्यायची आहे. माझ्याकडे कुठलंही शस्त्र नाहीय, तरीही मला पोलीस आत सोडत नाहीत. अशा प्रकारे मला रोखता येणार नाही,' अशी भूमिका शिवकुमार यांनी घेतली होती. मात्र आता त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
VIDEO: प्रेयसीची हत्या करणाऱ्या तरुणाला स्थानिकांकडून बेदम मारहाण