'आम्हाला नाही तर कुणालाच नाही, अशीच भाजपची भूमिका', 'ठाकरें'चा टोला

'आम्हाला नाही तर कुणालाच नाही, अशीच भाजपची भूमिका', 'ठाकरें'चा टोला

विधानसभा निवडणुका होऊन 18 दिवस उलटले असून सत्तास्ठापनेचा तिढा कायम आहे.

  • Share this:

मुंबई,10 नोव्हेंबर: विधानसभा निवडणुका होऊन 18 दिवस उलटले असून सत्तास्ठापनेचा तिढा कायम आहे. शिवसेना-भाजपमधील सत्ता संघर्ष टोकाला पोहोचला असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती आरोप केला आहे. राज्यात राजकीय परिस्थिती पाहता 'आम्हाला नाही तर कुणालाच नाही, अशीच भाजपची भूमिका असून महाराष्ट्राला पुन्हा निवडणुकीकडे ढकलण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की, 'आम्हाला नाही तर कोणालाच सरकार नाही', अशी भाजपची भूमिका आहे. राज्यावर पुन्हा निवडणुका लादण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, सत्तेसाठी आमचे प्रयत्न नाहीत, राज्याची एकूणच परिस्थिती पाहता या परिस्थितीत काय करता येईल, यासाठी काँग्रेसच्या आमदारांमध्ये चर्चा जयपूरमध्ये सुरू आहे. राज्यावर पुन्हा निवडणूक लादण्याचा भाजपचा डाव, काँग्रेस हाणून पाडेल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसने महाराष्ट्रातील त्यांच्या सर्व आमदारांना सध्या जयपूरमध्ये हलवले आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आमदारांची बैठक घेतली. यावेळी पक्ष नेतृत्त्व सर्व आमदारांचे ऐकतील आणि त्यांचे म्हणणे हे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहोचवतील. त्यानंतर सोनिया गांधी या सर्व परिस्थितीवर जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, असेही माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, एकीकडे सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. तर दुसरीकडे शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे. यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातही सत्तास्थापनेबाबत खलबते सुरु आहेत.

शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत काँग्रेस

सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची माहिती एका मराठी वृत्त वाहिणीकडून देण्यात आली आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा आणि आमदारांचा जयपूरमल्या बैठकीत निर्णय झाला असल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेच्या घडामोडींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण दिल्यानंतर आता इतर पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याची चिन्ह आहेत. एकीकडे संजय राऊत यांनीही आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस आपला शत्रू नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे.

सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार असून यासंदर्भात राष्ट्रवादीला पत्र पाठवणार असल्याची चर्चा या बैठकीमध्ये सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे जर असं झालं तर हा भाजपसाठी सगळ्यात मोठा धक्का आहे. यासगळ्यात काँग्रेसचे नेता आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवले आणि त्यावेळी जर शिवसेनेने पाठिंबा दिला तर काँग्रेस याबाबत विचार करेल, असे मिलिंद देवरा म्हणाले आहेत.

दरम्यान, 13 व्या विधानसभेची मुदत शनिवारी संपुष्टात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकार स्थापण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. मोठा पक्ष असलेल्या भाजपची सत्ता स्थापन करण्याची तयारी आहे का, असे विचारणा करणारे पत्र राज्यपालांनी शनिवारी भाजपला पाठवले आहे. त्यानंतर राजकीय हलचालींना वेग आला आहे. त्यातच शिवसेना आणि भाजपामधील मुख्यमंत्रीपदाचा वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. यामध्ये आता काँग्रेस पक्षानं उडी घेतली आहे.

भाजप सत्तास्थापन करण्यात अपयशी ठरल्यास राज्यपालांनी महाआघाडीला निमंत्रण द्यायला हवे. त्यावेळी शिवसेनेने पाठिंबा दिल्यास आम्ही सरकार स्थापन करू, असं वक्तव्य काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.यावेळी बोलताना देवरा म्हणाले की, जर राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवलं आणि त्यावेळी जर शिवसेनेनं पाठिंबा दिला तर काँग्रेस याबाबत विचार करेल. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्या या मोठ्या वक्तव्यानंतर राज्यकीय चर्चेला उधाण आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 03:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading