बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिपदावरुन सोडलं मौन, आज निघणार अंतिम तोडगा

बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिपदावरुन सोडलं मौन, आज निघणार अंतिम तोडगा

तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे मंत्रिपद कमी वाट्याला आल्याचे थोरातांनी सांगितले.

  • Share this:

मुंबई,1 जानेवारी: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी खाते वाटप-मंत्रिपदावरुन कुठेही वाद नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेस, एनसीपी नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात खातेवाटप यावर चर्चा होणार आहे. या चर्चेतून अंतिम तोडगा काढून खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता असल्याचे थोरात यांनी सांगितले. तसेच काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्याशी रात्रीत बोलणे झाले असून त्यांचा सन्मान करण्यात येईल, असेही थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस पक्ष हे कुटुंब असून त्या पद्धतीने आमदार थोपटे यांचा विचार केला जाईल. तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे मंत्रिपद कमी वाट्याला आल्याचे थोरातांनी सांगितले.

दरम्यान, मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर दगडफेक केली होती. मात्र, आमदार थोपटे यांनी या तोडफोडीची कल्पना नसल्याचे सांगत या घटनेचा निषेध केला. या प्रकारानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. संग्राम थोपटे यांचा योग्य वेळी योग्य सन्मान केला जाईल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

बाळासाहेब थोरात म्हणाले, संग्राम थोपटे हे चांगला कार्यकर्ता आहे. उत्तम आहे. त्यांच्या मागील पिढ्या काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. त्यांचे वडीलही मंत्रिमंडळात होते. मात्र, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे वाट्याला आलेल्या जागांचा ताळमेळ घालताना कसरत करावी लागत आहे. थोपटे यांना मंत्रिपद देऊ शकलो नसलो तरी त्यांचा योग्य वेळी योग्य सन्मान केला जाईल.

आक्रमक कार्यकर्त्यांनी पुण्यात काँग्रेसभवन फोडले

मंत्रिमंडळ विस्तारात भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना डावलल्याने भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. इतकेच नाही तर मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पुण्यातील काँग्रेसभवनामध्ये कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. भवनातील सर्व खुर्च्या आणि वस्तू कार्यकर्त्यांनी फोडल्या आहेत.

या पुढे या मतदारसंघात काँग्रेस पक्ष अस्तित्वात राहणार नाही तर संग्रामदादा थोपटे समर्थक म्हणून आम्ही काम करणार असल्याचे तीनही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. यापुढे भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेत्यांनी पाय ठेवल्यास त्यांचा जाहीर निषेध करण्यात येईल असंही भोर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनवणे यांनी म्हटले.

काँग्रेस भवनातील सर्व खुर्चा, टेबल, दरवाजे कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आले आहेत. अजूनही कार्यकर्ते भवनात असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी कारवाई करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. 'गेली 50 वर्षे थोपटेंनी या मतदारसंघात पक्षाला मोठे केले. ग्रामीण भागात काम करून पक्षाला वर आणलं. त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी पक्षासाठी कामं केले. अनेकदा निवडूण येऊनही त्यांनी पक्ष सोडला नाही. पण तरीदेखील त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही कोणीही शांत बसणार नाही. भविष्यात काँग्रेसच्या एकाही मंत्र्याचा सत्कार या जिल्ह्यात होणार नाही' आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2020 01:02 PM IST

ताज्या बातम्या