मुंबई, 16 जून : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेसला चिमटे काढल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी पलटवार करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सामनातील अग्रलेख हा अपूर्ण माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे. व्यवस्थित माहिती घेऊन लिहायला हवा होता. आमची भूमिका समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की समाधानी होतील असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. जनतेच्या हिताचे काही निर्णय अपेक्षित आहेत. सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये काँग्रेसला डावललं जात असल्याचंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलं होतं?
'काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. '
काँग्रेस महाविकास आघाडी सरकारसोबत भक्कम असल्याचंही थोरायत यांनी म्हटलं असलं तरीही पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गद खदखद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळूत आहे. आज अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात मुख्यमंत्र्यांना भेटून आपलं म्हणणं मांडणार आहेत. त्यांच्या या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संपादन- क्रांती कानेटकर