मुंबई, 4 जुलै : देशात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दरदिवशी मोठी वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशातच भारत बायोटेकने विकसित केलेली कोरोनावरील लस 15 ऑगस्टपर्यंत तयार होऊ शकते, असा दावा आयसीएमआरने केला. त्यामुळे काहीसा दिलासा व्यक्त केला जात असतानाच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक गंभीर आरोप केला आहे.
'कोव्हीड-19 साठी लस 15 ऑगस्ट पर्यंत तयार होईल हा #ICMR चा दावा अवास्तव आहे. लॉकडाऊनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी हा आटापिटा आहे का?' असा घणाघाती सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. तसंच चव्हाण यांनी याबाबत आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण केले पाहिजे, अशी मागणीही केली आहे.
कोव्हीड-१९ साठी लस १५ ऑगस्ट पर्यंत तयार होईल हा #ICMR चा दावा अवास्तव आहे. लॉकडाऊनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी हा आटापिटा आहे का? आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण केले पाहीजे.
— Prithviraj Chavan (@prithvrj) July 4, 2020
काय आहे कोरोना लशीबाबत दावा?
हैदराबादमधील भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने ही लस तयार केली आहे. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च (ICMR) आणि पुण्यातील नेशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीसह मिळून ही लस तयार करण्यात आली आहे. या कंपनीच्या लशीच्या ह्युमन ट्रायलला CDSCO करून हिरवा कंदील मिळाला आहे.
आयसीएआरच्या परिपत्रकानुसार 7 जुलैपासून या लसीचं ह्युमन ट्रायल सुरू होणार आहे. शिवाय 15 ऑगस्टपर्यंत ही लस लाँच होईल, असं सांगितलं जातं आहे. मात्र आता पृथ्वीराज चव्हाण यांनी या दाव्यावरून गंभीर आरोप केल्याने ICMR आणि आरोग्यमंत्र्यांकडून काही स्पष्टीकरण दिलं जातं का, हे पाहावं लागेल.
संपादन - अक्षय शितोळे