Home /News /mumbai /

उरले सुरले आमदारही एकनाथ शिंदेंच्या गोटात, तरीही उद्धव ठाकरे फ्लोर टेस्टसाठी तयार, काँग्रेसचा मोठा दावा

उरले सुरले आमदारही एकनाथ शिंदेंच्या गोटात, तरीही उद्धव ठाकरे फ्लोर टेस्टसाठी तयार, काँग्रेसचा मोठा दावा

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी पत्कारल्याने महाविकास आघाडी सरकारवरच्या अस्तित्वावर संकट ओढावलं आहे.

    विनोद राठोड, प्रतिनिधी मुंबई, 22 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी पत्कारल्याने महाविकास आघाडी सरकारवरच्या (Maha Vikas Aghadi) अस्तित्वावर संकट ओढावलं आहे. कारण शिंदे यांना शिवसेनेच्या आता जवळपास 50 आमदारांनी समर्थन दिलं आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या संकटाचे ढग दाटून आलेले असताना महाविकास आघाडीने आपल्याकडे बहुमताचा आकडा असल्याचा दावा करत आहे. त्यासाठी महाविकास आघाडी फ्लोर टेस्टसाठी तयार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: फ्लोर टेस्ट देण्यास तयार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेचे (Shiv Sena) उर्वरित आमदार हे फ्लोर टेस्टसाठी तयार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. शिवेसेनेचे जवळपास 45 पेक्षाही जास्त आमदार आता एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ गुवाहाटीला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचा ढाण्या वाघ अशा नावाने ओळख असलेले आमदार गुलाबराव पाटील हे देखील गुवाहाटीच्या बंडखोर आमदारांचा सध्या निवास असलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे. शिवसेनेला लागणाऱ्या धक्क्यांची मालिका अद्याप संपलेली नाही. कारण कट्टर शिवसैनिक, माहिम दादर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर हे देखील नॉट रिचेबल आहेत. असं असाताना काँग्रेस नेते हे उद्धव ठाकरे यांनी फ्लोक टेस्टसाठी तयारी दर्शवल्याचा दावा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ('महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणं गरजेचं', मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे आक्रमक) महाविकास आघाडीचं पुढचं भवितव्य काय? शिवसेनेचा शिंदे गट जर जास्त प्रभावी ठरला आणि फ्लोर टेस्ट खरोखर झाली तर महाविकास आघाडी सरकारसाठी सध्याचा काळ हा शेवटचा घटका आहे, असं मानायला हरकत नाही. कारण शिंदेंच्या बाजूने आमदारांची मोठी संख्या आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यात यश आलं तर हे सरकार टिकू शकतं. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी शिंदेंना मुख्यमंत्री करा, असा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री त्यासाठी देखील तयार आहेत. पण शिंदे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत सरकारमध्ये राहण्यास इच्छूक नाहीत. कारण त्यांनी मुख्यंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह नंतरही मोठा निर्णय घेण्याची वेळ आल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडी कदाचित महाविकास आघाडी सरकारच्या अस्ताच्याच दिशेला निघाल्याची चर्चा सुरु आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या