निरुपमांची गच्छंती, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरांची नियुक्ती

निरुपमांची गच्छंती, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरांची नियुक्ती

  • Share this:

मुंबई, 25 मार्च : मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून संजय निरुपम यांना दूर करत मिलिंद देवरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय निरुपम यांना पक्षातून मोठा विरोध होत होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यामध्ये मुंबईच्या शहरप्रमुख पदावरून वाद होते. त्या वेळी निरुपम यांनी बाजी मारत मुंबईचं शहरप्रमुखपद पटकावलं होतं. त्यानंतर गेले काही दिवस लोकसभेच्या जागा वाटपावरून दोघांमध्ये वाद होते.

आता अखेर मिलिंद देवरा यांना मुंबई प्रदेश काँग्रेसचं अध्यक्ष केलं आहे. ते गेले अनेक दिवस नाराज होते. न्यूज 18 शी बोलताना त्यांनी फेब्रुवारीतच आपल्याला काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे लोकसभा लढवण्याची इच्छा नाही, असं सांगितलं होतं.

मुंबई पश्चिमेच्या जागेवरच निवडणूक लढवण्यावर संजय निरुपम हटून बसले आणि त्यांना देऊ केलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ते तयार नव्हते.

या मतभेदांमुळे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा कदाचित नसेल, असं देवरा News18शी बोलताना म्हणाले होते. आपण याबद्दल पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना कळवलं आहे. "मुंबई काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीचं मला वाईट वाटतंय. आज अनेक काँग्रेस नेते घरी बसून आहेत. त्यांना का डावललं जात आहे आणि त्यांना आपल्याला वगळलं जात असल्याची भावना का आहे याविषयी विचारायला हवं", असं देवरा म्हणाले होते.

"मला बाह्या सरसावून हमरीतुमरीवर येणं मान्य नाही. असे वाद काँग्रेसमध्ये होत नाहीत. याबद्दल आता पक्षाचे वरीष्ठच निर्णय घेतील. त्यांन सगळं कळवलं आहे आणि माझ्या भावनाही पोहोचवल्या आहेत", असं 42 वर्षीय माजी खासदार मिलिंद देवरा तेव्हा म्हणाले होते.

कोण आहे मिलिंद देवरा?

मिलिंद देवरा हे माजी खासदार असून दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडून आले होते. 2004च्या निवडणुकीत निवडून आलेले ते सर्वांत तरुण खासदार होते.काँग्रेसप्रणित सरकारमध्ये ते माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री तसंच जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून कारभार पाहात होते. दिवंगत काँग्रेस नेते मुरली देवरा यांच्यानंतर दक्षिण मुंबई मतदारसंघाची मदार काँग्रेसने मिलिंद यांच्यावर सोपवली होती.

राहुलचा मास्टर स्ट्रोक, काँग्रेस अध्यक्षांची UNCUT पत्रकार परिषद

First published: March 25, 2019, 7:37 PM IST

ताज्या बातम्या