मुंबई, 24 जानेवारी : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ओबीसी समाजही आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. राज्यातील ओबीसी नेत्यांनी ओबीसी आरक्षणावर ठाम भूमिका मांडली आहे. भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सुद्धा ओबीसी समाजाची जनगणना करण्याची मागणी केली आहे.
पंकजा मुंडे यांनी ट्वीटकरून यंदाची जनगणना ही जातीनिहाय करावी अशी मागणी केली आहे. '2021 ची जनगणनाही जातीनिहाय होणे गरजेचं आहे. गावा-गावातून होणारी मागणी ही दिल्लीपर्यंत पोहोचणार यात शंका नाही', असं पंकजा मुंडे म्हणाल्यात.
2021 की जनगणना जाति निहाय होना आवश्यक हैं। गाँव-गाँव से निकली आवाज़ राजधानी तक जरूर पहुँचेगी इस बात मैं कोई शक नहीं हैं।#Castewisecensus2021
'आम्ही सुद्धा देशाचे आहोत, आमची सुद्धा गणना करा. ओबीसी जनगणना आवश्यक आणि अपरिहार्य आहे' असं म्हणत आपल्या सरकारला गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणाची आठवण करून दिली आहे.
दरम्यान, याआधी सुद्धा पंकजा मुंडे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून रोखठोक भूमिका मांडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ओबीसी समाजाची जनगणना करावी अशी मागणीच पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
आम्ही ओबीसीमध्ये कुणाला घुसू देणार नाही - विजय वडेट्टीवार
दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा 'ओबीसींची स्वतंत्र जनगणना होऊन त्यांची एकवेळ संख्या काय आहे ते कळू द्या' अशी मागणी केली आहे.
आम्ही ओबीसीमध्ये कुणाला घुसू देणार नाही,आम्ही ओबीसींचे पहारेकरी असून जागते रहो आमचं काम आहे. पण काही विघ्न संतोषी लोकं ओबीसींमध्ये अडथळा आणत असून आम्ही एक आहोत यासाठी जालन्यात मोर्चा काढत असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.