'समृद्धी महामार्ग' पूर्ण होण्याआधीच नामकरणावरून शिवसेना-भाजपमध्ये स्पर्धा

'समृद्धी महामार्ग' पूर्ण होण्याआधीच नामकरणावरून शिवसेना-भाजपमध्ये स्पर्धा

शिवसेनेतर्फे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

  • Share this:

मुंबई,12 डिसेंबर:नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. समृद्धी महामार्ग पूर्ण होण्याआधीच याच्या नामकरणावरून शिवसेना-भाजपमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. समृद्धी महामार्गास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपचे कल्याणचे (पूर्व) आमदार गणपत गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. समृद्धी महामार्ग पूर्णत्वास येण्याआधीच  नामकरणावरून स्पर्धा सुरु झाली आहे.

समृद्धी महामार्गाला माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी याआधी भाजपकडून करण्यात आली होती. तर शिवसेनेतर्फे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी होऊ लागली आहे. आता भाजपचेच कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून समृद्धी महामार्गास भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करत तसे पत्र सुद्धा दिले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग पूर्ण होण्याआधीच नामकरणावरून राजकारण सुरू झाले आहे.

नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग 701 किमी लांबीचा 8 पदरी नियोजित महामार्ग आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरला महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईशी जोडेल. हा महामार्ग 10 जिल्ह्यातून, 26 तालुक्यांतून आणि 390 गावांमधून जाणार आहे. या मार्गामुळे नागपूर आणि मुंबईमधील प्रवास 8 तासांत पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी 46 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

प्रकल्पाबाबतच्या ठळक गोष्टी..

- महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा संपूर्णपणे नव्याने उभा राहणारा आहे (ग्रीनफिल्ड प्रकल्प).

- नागपूर आणि मुंबईमधील अंतर, प्रवासी वाहतुकीला 8 तासांत व मालवाहतुकीला 16 तासांत पार करता येईल.

- या महामार्गामुळे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 24 जिल्हे एकमेकांना जोडले जातील.

- हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग राज्याच्या सहा महसूल विभागांपैकी पाच विभागात असलेल्या दहा जिल्ह्यांतील 26 तालुक्यांमधील 392 गावांमधून जाणार आहे.

- यामुळे महाराष्ट्रातील दूरवरचे जिल्हे मुंबईतील बंदराशी आणि जिथून नागपूरच्या हवाई मार्गानं जगात कुठेही मालवाहतूक होईल, अशा मिहानशी जोडले जाणार आहेत.

-यासाठी लागणारी जमीन एका विशिष्ट पद्धतीची योजना राबवून जमीन धारकांकडून एकत्र केली जाणार आहे, जिथे जमीनमालक या सर्व योजनेचे भागीदार होतील. याच योजनेअंतर्गत प्रस्तावित कृषी समृद्धी केंद्रांचा, म्हणजेच नव-नगरांचाही विकास होणार आहे.

-महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा प्रकल्प देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 05:58 PM IST

ताज्या बातम्या